हिंगोली : हिंगोली जिल्हा म्हणजे औद्योगिकदृष्ट्या प्रचंड मागासलेला जिल्हा आहे.  औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करावा आणि व्यवसाय म्हणून औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य द्यावे असा विचार करणारे जिल्ह्यामध्ये खूपच कमी लोक आहेत.  परंतु यालाही कलाटणी देत हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात राहणाऱ्या वनिता दंडे यांनी सौंदर्यप्रसाधने निर्माण करणारी कंपनी साकारली आहे 


वनिता दंडे ह्या मूळच्या रहिवासी वसमत शहरातीलच. सर्वसाधारण कुटुंब आणि घर चालवण्यासाठी करावी लागणारी आर्थिक तडजोड हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी घरीच एक ब्युटी पार्लर सुरू केले. काम करण्याची जिद्द असल्याने अनेक ग्राहकांनी त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची पसंती दिली आणि व्यवसाय वाढू लागला.  ह्या व्यवसायाला अधिक प्रगत व्यवसायात बदल करण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने ग्राहकांना सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना पनवेल येथे जावे लागले .


पनवेल येथे गेल्यानंतर वनिता यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम तेथील तज्ञ व्यक्तींनी सुरू केले. परंतु त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना जी सौंदर्यप्रसाधने वापरली जात होती ती सौंदर्यप्रसाधने घरीच निर्माण करत असल्याचे दंडे निदर्शनास आले. तेव्हा दंडे यांनी ती सौंदर्यप्रसाधने तयार करायचे ठरवले. ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेताना त्यांनी सौंदर्यप्रसाधने तयार करायचे सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा गावी म्हणजेच वसमत येथील घरी पोहोचल्या.





त्या संपूर्ण प्रशिक्षणाच्या जोरावर त्याचबरोबर पुन्हा नव्या उमेदीने ब्युटी पार्लरचे काम सुरू केले.  काम करत असताना त्यांनी पनवेल येथे प्रशिक्षण घेतलेल्या सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करून प्रसाधने ग्राहकांना वापरण्यास सुरुवात सुद्धा केली. त्या सौंदर्यप्रसाधनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळाली.  मोठ्या प्रमाणात ग्राहक या ब्युटी पार्लरमध्ये गर्दी करत होते. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली ती दंडे यांनी तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनानांच. पुढील काळात या सौंदर्यप्रसाधनांची ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा वाढली. कारण सर्वांना ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी ही सौंदर्य प्रसाधने खरेदीवर भर दिला. 


पुढील काळात मात्र सौंदर्यप्रसाधनांची मागणी वाढल्याने पुरवठा करणे मात्र दंडे यांना तांत्रिक त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हते. ही सौंदर्यप्रसाधने स्टॉलवर त्याचबरोबर बाजारपेठेत विक्री करण्यासाठी व्यवसायिक नाकारत होते. त्याचे कारण म्हणजे वनिता दंडे यांच्या या उत्पादनांना सरकार दरबारी कोणतीही नोंद नव्हती त्याचबरोबर मान्यता नसल्याने व्यवसायिक या सौंदर्यप्रसाधनांचा विक्री करण्यास नकार देत होते.


अशाही परिस्थितीत त्यांनी खचून न जाता आपल्या प्रसाधनांची सरकार दरबारी नोंदणी करायची आणि व्यवसाय वाढवायचा असे मनाशी ठरवले. अधिक माहिती नसल्याने त्यांना जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी केली जाते अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी थेट जिल्हा उद्योग केंद्र गाठले.जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्गदर्शनाखाली वनिता दंडे यांच्या सर्वज्ञ महिला उद्योग या नावाने त्यांच्या उद्योगाची नोंदणी करण्यात आली. परंतु अजून एक संकट त्यांच्यासमोर उभे राहिले ते म्हणजे आर्थिक तरबेज कशी करायची या संकटात ही त्यांना जिल्हा उद्योग केंद्राने खंबीरपणे साथ दिली. 25 लाख रुपयाचे अर्थसाह्य दंडे यांच्या उद्योगास दिले सर्व अडचणी दूर झाल्याने आता फक्त वेळ होती ती दंडे यांना अत्यंत चिकाटीने मेहनत करण्याची आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेत पूर्णवेळ व्यवसायात काम केले आणि या कंपनीत त्यांनी तब्बल 13 प्रकारचे विविध सौंदर्य प्रसाधने आणि मसाज ऑईल तयार करण्याचा उपक्रम सुरू ठेवला.


 यात महत्त्वाचे म्हणजे कंपनीत तयार करण्यात येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन दंडे या स्वतःच्याच शेतात घेतात. शेतामध्ये सत्वरी गुळवेल पपई कोरफड यासह अनेक वनस्पतींचे उत्पादन स्वतःच्या शेतात घेत त्यांचे सौंदर्यप्रसाधने निर्माण करण्यासाठी वापर केला जातो.


त्यामुळे कच्च्या मालासाठी त्यांना कुठेही धावपळ करायची गरज नाही किंवा कोणत्याही इतर मार्ग अवलंबण्याची गरज नसल्याने कच्चामाल थेट घरीच उपलब्ध केला आहे त्यामुळे आधीचा दळणवळणाचा खर्च सुद्धा त्यांचा कमी झाला आहे सध्या कंपनीमध्ये एकूण दहा ते पंधरा कामगारांना सुद्धा हाताला काम मिळाल्याने दंडे यांना वेगळं समाधान मिळते आहे.


सहकार्‍यांसोबत काम करत असताना मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले खरे परंतु ते उत्पादन विक्रीसाठी काय करावे हा नवाच प्रश्न उभा राहिला. त्यासाठीसुद्धा प्रशासनाने तितक्याच जोखमीने त्यांना धीर देत अगदी सर्वतोपरी मदत केली. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना विक्रीसाठी स्थान निर्माण करून दिले. त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये सुद्धा अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत सर्वज्ञ महिला उद्योग कंपनीत तयार केलेल्या सर्व उत्पादनांची विक्री करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली. 


इतकेच नव्हे तर भारत सरकारच्या वतीने त्यांना दुबई सारख्या देशांमध्येसुद्धा ह्या उत्पादनांना विक्री करण्यासाठी प्रदर्शनात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी करण्यात आली तयार केलेल्या उत्पादनांचा दर्जा चांगला असल्याने आजही दुबई सारख्या देशातून या उत्पादनांना मागणी आहे. यासह त्यांना 2014 चा मराठवाडा उद्योगिनी पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. 


तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या किंमती आणि विक्री बघता वर्षाकाठी त्यांची 40 ते 50 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. सध्या त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आता वेगळी यंत्रणा कार्यरत आहे. त्या ठिकाणी काम करणारे मुले हे दररोज मोठ्या प्रमाणात या सौंदर्यप्रसाधनांची विक्री करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आठवडी बाजारात त्याचबरोबर राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या आयोजित प्रदर्शनामध्ये यासह अनेक खाजगी बाजारपेठेमध्ये सुद्धा त्यांचे सौंदर्यप्रसाधने आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


एका खेड्यात बालपण गेलेल्या मुलगी आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी व्यवसायात उतरते तो व्यवसाय अगदी सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवत भारतासह इतर देशात या सौंदर्यप्रसाधनांची मागणी होते. ते म्हणजे निश्चित भारताच्या प्रगतीला असे व्यवसाय मोठी मदत करणार आहेत हे मात्र खरं आहे.