Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमाचा दिवस मानला जातो. अनेक जोडपी या दिवसाला लग्नाचा मुहूर्त म्हणून निवडतात. आज व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर राज्यात वेगवेगळ्या शहरात शेकडो जोडपी विवाहबद्ध झाली आहे. विशेष म्हणजे या बहुतेक जोडप्यांना त्यांचे आई-वडील आणि नातेवाइकांचाही पाठिंबा होता. त्यामुळं 'व्हॅलेंटाईन डे' आता लग्नाच्या तिथीचा दिवस म्हणूनही पुढं येत असल्याचं दिसून येतंय. यातील अनेक जोडप्यांनी आजच्या दिवशी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केलाय. त्यामुळे विवाहनोंदणी कार्यालयात नुसती झुंबड उडाली होती.


ज्या जोडीदारासोबत प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या त्या जोडीदारासोबत प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'व्हॅलेन्टाईन डे' च्या दिवशी लग्नाच्या बेडीत स्वतःला बांधून घेण्याचा आंनद या जोडप्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 14 फेब्रुवारी अर्थात सेंट व्हॅलेंटाईनला साक्ष ठेऊन केली गेलेली वैवाहिक आयुष्याची सुरुवात प्रेमाच्या वाटेने पुढं जाईल असा विश्वास या जोडप्यांना होता.


एरवी लग्न म्हटलं की पंचांग पाहून तारीख, वेळ बघून मुहूर्त ठरवला जातो.  त्या ठरलेल्या वेळेलाच मंगलाष्टका सुरु व्हायला हव्यात यासाठी धडपड सुरु असते. पण नव्या पिढीने निवडलेली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करण्याची ही पद्धत त्यांच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनाही आनंदनाने स्वीकारल्याचं दिसून येतंय.


राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर , नाशिक, औरंगाबाद , सोलापूर अशा वेगवगेळ्या शहरांमध्ये जोडप्यांनी लग्नासाठी आजचा दिवस निवडल्याचं पाहायला मिळालं. शिवाय आजच्या मुहूर्तावर केलेल्या लग्नाला इतर वेळच्या लग्नाएवढा खर्च देखील आला नाही.  फक्त 350 रुपयांमध्ये लग्नाची नोंदणी पूर्ण होऊन थेट मॅरेज सर्टिफिकेट हातात मिळत असल्यानं सगळेच खुश असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळं येणाऱ्या काळात 'व्हॅलेंटाईन डे' हा लग्न दिवस म्हणूनही ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको.


मुंबई आणि मुंबई उपनगरात 49 रजिस्टर मॅरेज


व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून मुंबई आणि उपनगरातील विवाह नोंदणी कार्यालयात 42 रजिस्टर मॅरेज तर दक्षिण मुंबईतील विवाह नोंदणी कार्यालयात सात रजिस्टर मॅरेज झाले आहेत.  


पुण्यातील 40 जोडपी अडकली लग्नबंधनात 


पुण्यातील विवाह केंद्रावर तरुण तरुणींची मोठी गर्दी बघायला मिळाली. या केंद्रावर तब्बल चाळीस जोडप्यांनी 'व्हॅलेंटाईन डे'चा मुहुर्त साधत आज विवाह केला. या जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारी विवाह नोंदणी कार्यालयाने केली होती. 


औरंगाबादमध्ये चार विवाह 


औरंगाबाद आज चार विवाह झाले आहेत. हे चारही विवाह आंतरजातीय आहेत. 


नाशिकमध्ये पाच विवाह 


नाशिक जिल्हा विवाह अधिकारी व्ही. डी. राजुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज पाच आंतरजातीय विवाहाची नोंदणी झाली.


कोल्हापुरात 13 विवाह 


कोल्हापुरात व्हॅलेंटाईन डे निमित्ताने 13 विवाह नोंद झाली आहे. यापैकी दोन विवाह आंतरजातीय झाले आहे


सोलापुरात एक विवाह 


सोलापुरात आजच्या दिवशी एक लग्न रजिस्टर पद्धतीने झाले आहे. हे लग्न आंतरधर्मीय आहे. 


नागपूरमध्ये 31 विवाह  


नागपूरमध्ये आज 31 विवाहांची नोंद रजिस्टर ऑफिस मध्ये झाली.