पंढरपूर : वैशाख कृष्ण एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. अपरा म्हणजे पापरूपी वृक्षाचा समूळ उच्छेद करणारी कुऱ्हाड, अपरा म्हणजे दोषरूपी काष्ठांना जाळून टाकणारा प्रखर अग्नी, अपरा म्हणजे पापरूपी अंधकाराचा निरास करणारा तेजस्वी सूर्य आणि अपार म्हणजे पापरूपी श्वापदे खाणारा बलवान सिंह असे या एकादशीचे माहात्म्य आहे. अपार फळ देणारी म्हणूनच या एकादशीला अपरा एकादशी असे नाव पडले आहे. अपरा एकादशी ही भक्ताचे परमहीत करणारी सर्वश्रेष्ठ तिथी मनाली जाते. अपरा एकादशीला वामनाच्या पूजेचे महत्व सांगितले जाते. भगवान विष्णूंच्या दहा अवतारातील वामन अवताराचे स्मरण अपरा एकादशीला करावे असे सांगितले जाते. जे कार्य कराल त्या कार्यावर अधिराज्य गाजवण्याची सामर्थ्य या व्रतामध्ये आहे.
 
लौकिक अर्थाने या एकादशीच्या वृत्तानंतर भक्ताला शांती , सुख समाधान याची प्राप्ती होते. मात्र समाधानाची अपेक्षा ही वस्तू प्राप्तीमध्ये नसते तर वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असते. ती वृत्तीची स्थिरता प्राप्त करून देण्याचे फळ या अपरा एकादशीच्या व्रतामुळे मिळते. अध्यात्मिकदृष्ट्या परमात्म्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन रूपे सांगितली जातात. सगुण  रूपातील जो परमात्मा आहे त्याच्याही पलीकडे असलेले परमात्म्याचे रूप म्हणजे निर्गुण रूप होय. या निर्गुण तत्वाला प्राप्त करून घेण्याचे फळ या अपरा एकादशी व्रताने मिळते. वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेला विठुराया हा सगुण आणि निर्गुण रूपाचा संगम मनाला जातो. या मुळेच ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगात दाखल देताना म्हणतात. 
       

  
तुझं सगुण म्हणू कि निर्गुण रे!
सगुण निर्गुण एक गोविंदु रे !!


संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,  भगवंत तुला सगुण म्हणावे की निर्गुण... हा विचार  परंपरेने शेकडो वर्षे चालत आलेला असला तरी सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस. तर जगतगुरु तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगातून पांडुरंग परमात्म्याचे वर्णन करताना म्हणतात. 
           
सगुण निर्गुणाचा ठाव!
विटे धरियेले पाव!!


म्हणजेच, पंढरीचा विठुराया हा सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचे एकच अधिष्ठान आहे. सगुण व  निर्गुण एक मानले असले तरी सगुणांच्या उपासनेने निर्गुण तत्वापर्यंत जात येते असे संत एकनाथांना वाटते आणि म्हणूनच ते आपल्या प्रमाणात म्हणतात. 


निर्गुणी पावलो सगुणी भजता! 
विकल्प धरीत जिव्हा झडे!!


सगुणांच्या नामस्मरणाने निर्गुणाला पावलो हे सांगताना भक्तांकडून घडलेले जे नामस्मरण आहे तेच त्याला निर्गुण तत्वापर्यंत घेऊन जाते हेच अपरा एकादशीचे फळ आहे. वारकरी संप्रदायात तसे सर्वच एकादशीला तेवढेच महत्व असले तरी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचे महत्व आणि त्याचे फळ हे भिन्न असते.