नंदुरबार : नंदुरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठी यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील निशा पावरा या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे, असा आरोप आहे. गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो  स्वामीत्व पावती नव्हती. म्हणुन या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतुक करणारा ट्रक अडवला होता. 


यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरा यांच्यासह अन्य दोन महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठी यांमध्ये वाद झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठी यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. त्यानंतर संतप्त तलाठींसह महसूलच्या सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे.


आपण कुणालाही मारहाण केली नसून संबंधीत महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा त्यांना दावा केला आहे. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे.  दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड तणावात असून याप्रकरणी न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :