बीड | ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी लवादामध्ये चांगला निर्णय होऊ शकतो, पण काही विघ्नसंतोषी मंडळी यात खोडा घालत असल्याचा आरोप ऊसतोड मजूर संघटनेचे नेते केशव आंधळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप चालूच राहणार असून 30 तारखेपर्यंत दरवाढ न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
राज्यातील ऊस तोड कामगार हे मागच्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत. ऊसतोड कामगारांच्या मागण्या संदर्भांमध्ये पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांच्या लवादात सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भातला निर्णय लवकरच होणार आहे.
परतीचा मान्सून नसल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच शेतकऱ्यांचा ऊस सध्या वाळत आहे. त्यामुळे संपाचा परिणाम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार शेतकरी व कारखानदारांचे नुकसान टाळता यावे यासाठी पंकजा मुंडे पुन्हा एकदा जयंत पाटील आणि शरद पवारांना भेटणार आहेत. लवाद जो मार्ग काढेल तो आम्हाला व संघटनांना मान्य असेल, पण तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केलं आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित झाली असली तरी दरवाढीसाठी पंकजा मुंडे शासन स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यासंदर्भात 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. त्यामुळे दरवाढीसाठी लवकरच मुंबईत बैठक होईल. 30 तारखेपर्यंत दरवाढ मिळाली नाही तर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा केशव आंधळे यांनी दिला.