मुंबई: सन 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार फितूर होण्याचं सत्र सुरूच आहे. गुरूवारच्या सुनावणीत साक्षीदार क्रमांक 41 यांने एटीएसवर खळबळजनक आरोप करताच हा साक्षीदार फितूर झाल्याचं सरकारी पक्षानं घोषित केलं. मालेगांव ब्लास्ट प्रकरणात आतापर्यंत 17 साक्षीदार फितूर झाले आहेत. दरम्यान, गुरूवारच्या सुनावणीत मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील दोन फरार आरोपींविरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली. रामजी कालसंगरा, संदीप डांगे यांच्या नावानं एनआयए कोर्टानं ही रेड कॉर्नर नोटीस जारी केली. या प्रकरणाचा सध्या तपास करत असलेल्या एनआयएच्या विनंतीवरून कोर्टानं ही कारवाई केली आहे.


गुरूवारी फितूर घोषित करण्यापूर्वी या साक्षीदारानं कोर्टाला सांगितलं की, "मला एटीएसनं जबरदस्तीनं घरातून तीन ते चार वेळा नेलं आणि तीन ते चार दिवस बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवून मारलं. या मारहाणीत आपल्या एका कानाला इजा झाली. एका रात्री दोन-तीन वाजता माझा डोक्याला बंदूक ठेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. हे सर्व करून ते जबरदस्ती मला आरएसएस संघटनेचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायला सांगायचे. पण मी आरएसएसचा सदस्य नाही आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याची नावही मला माहीत नाहीत, म्हणून ते वारंवार धमक्या द्यायचे, मारायचे."


29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून सर्व आरोपी जामीनवर बाहेर आहेत. माध्यमांनी या खटल्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मुलाखत, चर्चा करू नयेत, साक्षीदारांची नावे, पत्ता उघड करू नये, इत्यादी बंधने घालत प्रवेश दिला होता. सध्या याचं काही माध्यमं उल्लंघन करत असल्याचा आरोप करत पुरोहित यांनी हा खटला इन कॅमेरा चालवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: