Antilia Bomb Scare Case : अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळलं होतं, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिला आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात देशमुखांच्या या जबाबाची नोंद करण्यात आली आहे. अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं आणि सिंह हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असं आपल्याला कळलं होतं. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असं अनिल देशमुख यांनी सांगितल्याचं ईडीनं आरोपपत्रात नमूद केलं आहे. 


परमबीर सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी 20 मार्च 2021 रोजी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावं समोर आल्यानं सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आलं होतं. 


सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. 5 मार्च 2021 रोजी विधानसभा सुरू असताना सिंह यांना विधानसभेत ब्रीफिंगसाठी बोलावलं होतं, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंह यांना बोलावलं तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंह देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटलं आहे. 


यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ब्रीफिंग होत असताना मी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि गृह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान हे देखील समोर आलं की, सिंह त्यांच्या उत्तरानं आमची दिशाभूल करत आहेत आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटलं आहे. 


मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली


17 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्र्यांनी आणि मी परमबीर सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांना पुन्हा डीजी होमगार्ड बनवण्यात आलं, मला समजलं होतं की, सिंह हेच मास्टरमाईंड होते. सत्य लपवत होते, असं देशमुखांनी सांगितलं. 


20 मार्च 2021 रोजी सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझ्यावर आरोप केले, ज्याच्या आधारे अधिवक्ता जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने 5 एप्रिल 2021 रोजी सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर मी त्याच दिवशी मॉरल ग्राऊंडवर माझ्या पदाचा राजीनामा दिला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha