रत्नागिरी : 'वाचाल तर वाचाल' या शब्दांमध्येच सारं काही आलं. पुस्तकं, वाचन याबाद्दल कमीत कमी शब्दात व्यक्त होता येतं आणि त्याचं महत्व देखील कळतं. महाराष्ट्राला साहित्यसंपदेची, लेखकांची, कलाकारांची, संस्कृतीची एक वेगळीच देणगी लाभली आहे. अगदी श्रीलंकेतील सिंहली भाषेत देखील आपल्याला मराठी भाषेचे दाखले दिसून येतात. विपुल अशी साहित्यसंपदा लाभलेली भाषा म्हणजे मराठी. राज्यात विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध असलेली ग्रंथालयं देखील मोठ्या संख्येनं आहेत. गाव-खेड्यांमध्ये देखील छोटी- छोटी वाचनालयं आहेत. पण, यासाऱ्यांसमोर सध्या आव्हान, समस्या आणि संकटं उभी राहिली आहेत. अर्थातच त्याला कारण म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा निर्णय. सारे व्यवहार ठप्प असताना त्याचा फटका आता ग्रंथालयांना देखील बसला आहे. मोठ्या प्रमाणातील आर्थिक गणितं बिघडली आहेत. कामगारांचे पगार देण्याकरता देखील सध्या पैसे नाहीत. सद्यस्थिती पाहता काही वाचनालयं बंद होतील का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. वाचकांना पुस्तकं मिळत नसल्यानं होणारा मनस्ताप हा वेगळा. पण, आता अनलॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ग्रंथालयं सुरू करा अशी मागणी जोर धरताना दिसत आहेत. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू झाली मग, ग्रंथालयं सुरू करण्यास काय हरकत? असा सवाल विचारला जातोय. नियमांच्या अधीन राहून आम्ही हे सर्व सुरू करू आणि काळजी घेऊ असा सूर सध्या ऐकायला मिळत आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती, वैज्ञानिक, मिसाईल मॅन. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी देशभरात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त वाचन प्रेमींनी खूशखबर द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर, सध्या देश, राज्य अनलॉककडे जातोय तर नियम पाळत ग्रंथालयं सुरू करण्यास परवानगी का मिळत नाही? असा सवाल देखील केला जात आहे.
जुन्या ग्रंथसंपदेला धोका
राज्यातील या परिस्थितीबाबत एबीपी माझानं रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी ''राज्यात शंभर वर्षे जुनी वाचनालयं देखील सध्या आहेत. एकंदरीत सारी परिस्थिती पाहता आर्थिक फटका बसत आहे ही गोष्ट मान्यच. पण, त्यापेक्षा पुस्तकांची होणारी हानी अधिक गंभीर बाब आहे. विविध विषयांवरील हजारो, लाखो पुस्तकं सध्या या ग्रंथालयामध्ये आहेत. पण, त्या ठिकाणी मागील सहा ते सात महिन्यापासून त्यांची निगा राखली गेलेली नसल्यानं त्यांना बुरशी लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे या बाबींचा विचार अधिक गंभीरपणे झाला पाहिजे. जर, नियम आणि अटींच्या आधारे बार सुरू होत असतील तर मग सरकार ग्रंथालयाच्या बाबतीच सावध भूमिका का घेत आहे? सध्या वाचकांचा हिरमोड तर होत आहे. शिवाय, काही ग्रंथालयांमध्ये कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही. तर. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कमी देखील केले जात आहे. याबाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारनं काही अटी आणि नियम जरूर घालावेत. आम्ही त्यांचं पालन करू. ग्रंथालयं सुरू करावीत'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आजवर आम्हाला पगार मिळण्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. पण, आम्ही याच क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांशी देखील बोललो. त्यांना पगार मिळत नसल्याची माहिती रत्नागिरीतील नगर वाचनालयातील ग्रंथपालांनी दिली आहे.
मानसिक आरोग्यवर काय होतोय परिणाम?
अनेकांसाठी पुस्तकं हेच सर्वस्व असतं. ज्ञानार्जनाचं उत्तम माध्यम म्हणजे पुस्तकं. सुख-दु:खात साथ देत, जगण्याची उमेद हीच पुस्तकं देतात. पण, पुस्तकं वाचायला मिळत नसल्यानं त्याचा परिणाम हा तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील होतो. ही बाब देखील लक्षात घेण्याजोगी. ग्रंथालयं सुरू न होणं ही काळजीची बाब आहेत. पुस्तकं वाचताना प्रत्येक व्यक्तिला वेगळी अनुभूती मिळते. शिवाय मेंदूचा होणारा व्यायाम देखील होतो. वाचनानं क्रिएटीव्हीटी वाढतात. त्यामुळे वाचनापासून कुणीही वंचित राहता कामा नये. हॉटेल, बार सुरू होत असताना ग्रंथालयं बंद ठेवणे चुकीचं आहे. वाचलेल्या गोष्टींची अनुभूती मिळण्यासाठी ऑनलाईन वाचनापेक्षा पुस्तकं वाचनं हे महत्त्वाचं आहे. यामुळे तोटा देखील मोठ्या प्रमाणात होतंय. वाचन करण्यास न मिळाल्यास त्याचा मनावर देखील परिणाम होत असल्याची माहिती रत्नागिरीतील मनोविकार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.
रत्नागिरीतील ग्रंथालयाची काय अवस्था?
ग्रंथालयांची नेमकी काय अवस्था झालेली असेल हे समजून घेण्याकरता आपण रत्नागिरी शहरातील नगर वाचनालयाचं उदाहरण घेतलं तरी पुरेसं आहे. हे वाचनालय राज्यातील सर्वात जुनं वाचनालय असून त्याची स्थापना 1828 साली झाली आहे. म्हणजेच तब्बल 193 वर्षे जुनं इतकं हे वाचनालय आहे.सध्या या वाचनालयात तब्बल 1 लाखापेक्षा देखील जास्त पुस्तकांची संख्या आहे. मराठी, हिंदीसह इंग्रजीतील साहित्य देखील याठिकणी उपलब्ध आहे. रोज दीडशे वाचक या ठिकाणी येतात. मुंबई, पुणे या शहरातील ग्रंथालयांची तुलना करता जवळपास 5 ते 6 हजारांच्या घरात या ठिकाणची वाचकसंख्या आहे. महिन्याला जवळपास 50 ते 60 हजारांची उलाढाल या ठिकाणी होते. एकंदरीत महानगरांची तुलना करता रत्नागिरीसारख्या तुलनेनं छोट्या असलेल्या शहरात ही संख्या मोठीच म्हणावी लागेल.शिवाय, जिल्ह्यात आणि शहरात देखील इतर वाचनालयं आहेत.त्यांच्याकडे देखील नजरअंदाज करून चालणार नाही. यावरू राज्य आणि मोठ्या शहरांमधील वाचनालयांची परिस्थितीची आपण किमान अंदाज बांधू शकतो.