नाशिक :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन (Santosh Deshmukh murder case) राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने होत आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडकडून (Nashik Sambhaji Brigade) एक अनोख आंदोलन करण्यात येत आहे.  नाशिकमध्ये सुलभ शौचालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. सुलभ शौचालयामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. 


धनंजय मुंडेंना देखील सहआरोपी करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात येत आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावे अशी मागणी करत नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडकडून सुलभ शौचालयामध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचे फोटो लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का?


धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं आता पुढे काय होणार?, अशी चर्चा रंगली आहे. तसेच धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का?, असा सवालही उपस्थित केला जातोय. मात्र धनंजय मुंडेंची आमदराकी सध्यातरी रद्द होणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही. चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही. राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येत होता. 


नेमकी कशी घडली घटना?


वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. 



महत्वाच्या बातम्या:


Dhananjay Munde Resign: धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला, आता पुढे काय, आमदारकीही जाणार?