मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील सध्याच्या स्थितीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकारात्मक भूमिका घेतील. लवकर सरकार स्थापन होणं गरजेच आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देईल असं वाटत नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.


मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांनी दोन पावलं मागे यावं. भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला होऊ शकतो. शिवसेना आमच्या सोबत असणे गरजेचं आहे. येत्या दोन दिवसात शपथविधी पार पडला पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचं आहेत, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.


शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजप मान्य करणार नाही. ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होणे योग्य आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला रिपाइंचा पाठिंबा रामदास आठवलेंनी दिला आहे. शिवसेनेला त्यांच्या जागांप्रमाने सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे. सरकारमध्ये शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळतील, मात्र शिवसेनेने अवास्तव मागणी करु नये, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.



भाजपकडून शिवसेनेला 26-13 ची 'ऑफर'


भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 13 मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. तर भाजप स्वत:कडे 26 मंत्रिपद ठेवणार, असा हा नवा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रस्तावात मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाहीत, हे भाजपनं स्पष्ट केलं आहे.


देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड


भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नेते मंडळींनी विधीमंडळात येऊन देवेंद्र फडणवीस यांची गटनेते म्हणून निवड केली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार हे स्पष्ट झालं आहे. विधीमंडळ नेता निवडीनंतर आता शिवसेनेचा रागरंग बघून देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते या नात्यानं सत्तास्थापनेचा दावा सादर करू शकतील.



संबंधित बातम्या