सांगली : आटपाडी तालुक्यातील उंबरगावमधील आशिष सुनील सावंत या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात वडिलांच्या बंद पडलेल्या MAT च्या इंजिनापासून चार चाकी गाडी बनवली होती. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर आशिषने ही गाडी कशी बनवली याचा लाईव्ह व्हिडीओ करण्यात आला होता. हा लाईव्ह व्हिडीओ 24 तासामध्ये 15 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आणि आशिषच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक केलं गेलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेतली आहे. आशिष सावंतला मेक इन इंडियाच्या अंतर्गत मदत करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे.


आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांना स्वतः नितीनजी गडकरी यांनी फोन करुन आशिषला मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. आशिषने बनवलेल्या प्रत्येक वस्तूची माहिती देण्यास देखील सांगण्यात आलं आहे.


आशिष आटपाडीमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयचे शिक्षण घेतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने ही गाडी बनवली आहे. या गाडी बरोबरच आशीषने यापूर्वी बंदूक, स्पॉट वेल्डिंग मशीन, स्केटिंग, हॅन्ड सॅनिटायझर मशीन, तलवार, विटा उचलणारे मशीन, मका सोलणारे मशीन अशा अनेक आणि शेतकऱ्यांना उपयोगी येणारे वस्तू आशिषने बनवल्या आहेत.



आशिष लहानपणापासूनच आपला एखादा प्रयोग तयार करून विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेत असे. अनेकवेळा त्याला प्रथम क्रमांक देखील मिळाला होता. त्यामुळेच त्याने घरची परिस्थिती आणि आपली आवड पाहून आयटीआय करायचे ठरवले. या क्षेत्रातील त्याची हुशारी पाहून त्याच्या आई-वडिलांनी देखील सपोर्ट केला. त्यामुळेच त्याने 3 महिन्यात MAT गाडीचे मॉड्युफिकेशन करत सोलर आणि पेट्रोलवर चालेल अशी गाडी बनवली. या गाडीत त्याने दोन व्यक्ती बसतील, अशी टेक्नॉलॉजी वापरली आहे. शिवाय साऊड सिस्टीम, मोबाइल चार्जर अशा अनेक बाबी त्याने या गाडीत जोडल्या आहेत. भविष्यात गाडीला हुड करून शेती कामांसाठी वापरता येईल अशी ट्रॉली बनवण्याचा त्याचा विचार आहे.


एका दुष्काळी भागातील मुलगा स्वतःच्या हुषारीवर इतकी चांगल्या पद्धतीने बंद पडलेल्या दुचाकीची चार चाकी गाडी बनवतो, याचा त्याच्या मित्र परिवाराला मोठा अभिमान वाटतो. नितीन गडकरी यांनी आशिषची पाठ थोपटल्याना त्याचा उत्साह आणखी वाढला आहे.



इतर बातम्या

MHT CET कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली-शिक्षणमंत्री उदय सामंत