Narayan Rane meets Chief Minister Eknath Shinde : केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं.
लोकसभेसाठी चाचपणी?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली होती. त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेचे उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेचे रिंगणात असतील की नाही? याची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद, रत्नागिरी जिल्ह्यात काय?
कधीकाळी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजे नारायण राणे यांचा बालेकिल्ला असं समीकरण होते. पण, सध्या मात्र राणेंची राजकीय ताकद पाहता तसं म्हणता येईल का? याबाबत मात्र शंका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही. त्यामुळे महायुतीत इतर लोकप्रतिनिधी त्यांनी किती मदत करतात? यावर सारी गणितं अवलंबुन असणार आहेत. विशेष बाब म्हणजे सामंत बंधुंचा रोल देखील यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. करण सामंतांना उमेदवारी नाकारल्यास त्याचा परिणाम राणेंच्या मतदानावर होईल का? हा फॅक्टर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विनायक राऊतांचे कडवे आव्हान
दुसरीकडे, ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांचा तळागाळात असलेला दांडगा जनसंपर्क, शिवसेनेतील बंडांनंतर देखील ठाकरे गटात न झालेली मोठ्या प्रमाणातील फाटाफुट, राणेंची रिफायनरीच्या बाजुनं असलेली भूमिका, 2014 च्या विधानसभेतील पराभवानंतर राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यात कमी झालेला जनसंपर्क, तसेच रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना महायुतीत असणाऱ्या सामंत बंधुंची मिळणारी साथ तसेच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्यापी न झालेलं मनोमिलन या बाबी देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. पण, या साऱ्यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे कोकणातील यंदाची लोकसभेची निवडणूक रंगतदार, चुरशीची आणि सर्वच राजकीय नेत्यांच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय पुण्याईची कसोटी पाहणारी असणार हे नक्की आहे.
त्यामुळे नारायण राणे यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी जमीन तयार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न तरी करत नाही ना? अशीही चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे आणि राज ठाकरेंचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती.
इतर महत्वाच्या बातम्या