मुंबई : "मी आज दक्षिणमध्य मुंबई लोकसभा क्षेत्रात फिरत आहे. पक्ष मजबूत करणे, पक्षासोबत लोकांना जोडणे यासाठी हे दौरे आहेत. या आधी मी कल्याण दौरा केला, यावेळी अधिकाऱ्यांशी बोललो. केंद्राच्या योजनांसोबत राज्यातील योजना देखील लागू करा असे मी त्यावेळी आधीकाऱ्यांना सांगीतले. भाजप कशी मजबूत होईल याबाबत चर्चा झाली. लाभार्थ्यांसोबत देखील आम्ही चर्चा केली. 40 वर्ष ज्यांना शौचालयासाठी बाहेर जावं लागत होतं त्यांना आता शौचालय मिळालं. मागील आठ वर्षे गरिबांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने काम केलं. भाजपने जे सांगितले ते करून दाखवले, मग ते राम मंदिर असो किंवा इतर गोष्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाचे लोकप्रिय नेते आहेत, असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी व्यक्त केलंय. 


अनुराग ठाकूर हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते दक्षिणमध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. फॉक्सकॉन प्रकल्पावरून देखील त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. "राज्यात ज्यांची तीन वर्षे सत्ता होती ते आज बोलत आहेत. तीन वर्षे मातोश्रीचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी बंद होते ते आज बोलत आहेत. सत्तेत जे होते ते काय करत होते? आयएन विक्रांतच्या वेळी का बोलले नाहीत? तेव्हा त्यांचे ट्विटर कुठे होते? सत्तेपासून दूर गेल्याने हे माशा सारखे फडफडू लागले आहेत, असा हल्लाबोल यावेळी अनुराग ठाकूर  यांनी केला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ओबीसी नाहीत, भाजप त्यांना ओबीसी (OBC) म्हणून प्रोजेक्ट करत आहे असा आरोप आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावरून देखील अनुराग ठाकूर यांनी पटोले यांच्यावर टीका केली. "काँग्रेस अजून त्यांच्या चुका सुधारत नाहीत. इंग्रज गेले पण कॉंग्रेस त्यांच्या विचाराने चालत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले, असे अनुराग ठाकूर म्हणाले. 


अनुराग ठाकूर यांनी यावेळी काँग्रेच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली. "जे भारताला तुकडे गँगमध्ये बघतात तेच भारत जोडो म्हणत आहेत. तुकडे तुकडे गँग सोबत हे आजवर उभे होते यापेक्षा हास्यास्पद काय असेल. यांचा पराभव झाला तेव्हा हे वायनाडमध्ये गेले. परिवार पार्टीला जोडू शकला नाही ते देश काय जोडणार, अशी टीका यावेळी अनुराग ठाकूर यांनी केली.