Tuljabhavani : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी देवीच्या नऊ दिवसीय मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रउत्सव पुर्वीचा मंचकीनिद्रा तयारीस शनिवारी सकाळी सुवासनीनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तुळजाभवानी गादीचा कापुस वेचणे पिंजण्यास सुरूवात केली. आराधी मंडळी आरादी गीत गायले. हा कापुस मुस्लीम धर्मिय पिंजारी कुंटुबांनी पिंजुन दिल्यानंतर निकते कुंटुंबियांनी नवीन कपड्याने तयार केलेल्या तीन गाद्यांमध्ये हा कापूस भरला. इकडे मातेचे शेजघर पलंग खोली पलंगे कुंटुंबियांनी स्वछ घासून, धुवून स्वछ केल्यानंतर चांदीचा पलंगावर नवार बांधण्यात आल्या. पलंगावर तीन गाद्या तीन लोड ठेवण्यात आल्यानंतर पलंगपोस टाकुन बाजुला मखमली पडदे लावण्यात आले. देवीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी पाच वाजता तयार केले.


साडेसहा वाजल्या नंतर देविजींना भाविकांचे दही,दुध पंचामृताने अभिषेक करण्यात आल्यानंतर देवीची मूळमुर्ती स्वछ करण्यात आली. नंतर वाघे कुंटुंबियांनी दिलेली हळद (भंडारा) देवीला लावण्यात आली त्यानंतर देवीची मूळमुख्य मुर्ती भोपे पुजारी वृदांनी हातावर अलगद उचलून ती शेजघरात आणून चांदीचा पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. मूर्ती निद्रिस्त आल्यानंतर धुपारती करण्यात आली. त्यानंतर प्रक्षाळपूजा पार पडली आणि तुळजामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवा पूर्वीच्या नऊ दिवसीय मंचकी निद्रेस आरंभ झाला आहे. यावेळी देविजींचे मंहत भोपे पुजारी सेवेकरी मंदीर विश्वस्त प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते. 


श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत मातेला सकाळ, संध्याकाळ सुगंधी तैलअभिषेक केला जाणार आहे. तुळजामातेची मंचकीनिद्रा चालु असताना पुजारीवृंद विश्रांतीसाठी गादी उशी पलंग याचा वापर करत नाहीत. कारण यावेळी देवीची मंचकी निद्रा सुरु असते.


26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला आरंभ


यंदा 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या दिवशी देवीच घटस्थापना केली जाईल. 26 सप्टेंबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना केली जाईल. दुपारी बारा वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आल्यानंतर देवीच्या शारदी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.


तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक


महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक आहे. हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. येथे जगभरातील भाविक दाखल होत असतात. नवरात्रीमध्ये तुळजाभवानी मंदिरात मोठा उत्सव असतो. 


मंचकी निद्रा म्हणजे काय?


मंचकी म्हणजे पलंग. पौराणिक कथेनुसार, नवरात्री आधी देवी योग निद्रेत होती. यावेळी देवांचं महिषासूरासोबत युद्ध सुरु होतं. महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म, विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसांनंतर निद्रेतून उठवतात आणि देवलोकांचं रक्षण करण्याची विनवणी करतात. यावेळी देवी निद्रेतून जागी होऊन घोर रुपात प्रकट होते आणि महिषासूराता वध करते. त्यामुळे दरवर्षी नवरात्री देवीची मंचकी निद्री पार पडते.