मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.


अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.


अमित शाह यांच्या दौऱ्याने कोकणात भाजपला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते पण शेतकरी आंदोलकांनी चक्का जाम पुकारल्याने हा दौरा रद्द करण्यात आला होता.


होय, माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं'; नारायण राणेंची कबुली


खासदार नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपने अनेकदा थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे असं सांगण्यात येतंय. कोकणात भाजप पक्षाचा विस्तार वाढवायचा असेल तर नारायण राणेंना बळ द्यावं लागेल असा काहीसा होरा भाजपचा आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजप आव्हान देऊ शकेल. त्यामुळे कोकणातील कार्यकर्त्यांत संचार निर्माण करण्यासाठी अमित शाहंच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे.


राज्यातील महाविकास आघाडीमध्ये राजकीय करघोड्या सुरु आहेत. आता नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनीही दावा केला आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतरणाच्या विषयावरुन काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पहायला मिळतंय.


सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत नारायण राणे-विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची