पंढरपूर : पुण्यातील ससून रुग्णालयातून गायब झालेली एक व्यक्ती सात वर्षांनी घरी आली आहे. सात वर्ष पाकिस्तानात वास्तव्य करुन ही व्यक्ती घरी परतली आहे. सत्यवान भोंग असं या व्यक्तीं नाव असूव माढा तालुक्यातील लऊळ गावचे ते रहिवासी आहेत.


सत्यवान मनोरुग्ण असल्याने पत्नीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले आणि पत्नी औषधे आणायला गेली. तेथून सत्यवान गायब झालेत त्यानतंर ते सात वर्षांनी परत आले आणि तेही पाकिस्तान मधून. हॉस्पिटलमधून निघून गेल्यावर सत्यवान यांचा शोध घरच्यांनी घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र कोणताच तपस लागत नसल्याने कुटुंबीयांनीही दैवावर हवाला ठेवून बसले होते. अचानक फेब्रुवारी 2020 मध्ये सत्यवान पाकिस्तानात असल्याची माहिती सैन्यदलाकडून पोलिसांना मिळाली. त्यांना सोडवण्यासाठी पुराव्याची सर्व कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात झाली आणि दुर्दैवाने पुन्हा कोरोनाचे संकट आले आणि सर्व लॉकडाऊन झाल्याने सत्यवान याना पुन्हा पाकिस्तानातच राहावे लागले.


कोरोनाचे संकट कमी झाल्यावर डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा त्यांना भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला. सर्व कागदपत्रे जमा करून पोलिसांमार्फत भारतीय उच्यायोगाला देण्यात अली आणि अखेर सत्यवान यांचा पाकिस्तान मुक्काम संपला आणि त्यांना अमृतसर येथील गुरुनानक संस्थेत त्यांना ठेवण्यात आले. येथून कुर्डुवाडी पोलिसांचे पथक सत्यवान यांचा पुतण्या गणेश भोंग यांना घेऊन अमृतसर येथे गेले. यावेळी 7 वर्षांनंतरही सत्यवान यांनी आपल्या पुतण्याला नावाने ओळखले असले तरी दुसरी कोणतीच माहिती त्यांना देता येत नव्हती. सत्यवान फक्त आपले नाव गाव व पत्ता सांगू शकत होते म्हणूनच आज ते ७ वर्षानंतर पाकिस्तानातून परतू शकले.


कुर्डुवाडीच्या पोलीस पथकासोबत सत्यवान यांना कुर्डुवाडी येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेथून त्यांना लऊळ येथील वस्तीवरील घरी आणण्यात आले. आपल्या मुलाला बघून 90 वर्षाच्या आईला खूप आनंद झाला, मात्र डोळे नसल्याने केवळ गोंजारून स्पर्शाने ती आपल्या मनोरुग्ण मुळाशी मूक संवाद साधत राहिली. बाळा तू कुठं होतास, काय खात होतास असे भाबडे प्रश्न विचारात ती सत्यवान याला भंडावून सोडत असली तरी तो मात्र याबाबत काहीच बोलत नव्हता.


आता नवरा घरी आल्याचे कळल्यावर कुर्डुवाडी येथे राहणारी त्याची पत्नी देखील गावाकडे आली पण ती सत्यवान याला न भेटताच परत गेल्याचे कुटुंबाने सांगितले. सत्यवान आता आपल्या घरी आल्याचे सांगतो. आपल्या भावाला आईला ओळखतो त्यांचेशी एखादा शब्दही बोलतो. मोठ्या भावासोबत शेतात काम करायलाही त्यांनी सुरुवात केली. मात्र सत्यवान पाकिस्तानात पोहोचलेच कसे हे कोडे मात्र अद्याप उलघडू शकले नाही. पुण्यातील ससून हास्पिटल मधून 21 दिवस उपचार घेऊन गायब झालेले सत्यवान 7 वर्षे पाकिस्तानात राहून सुखरूप घरी पोहोचले हेच भोंग कुटुंबासाठी दिलासा आणि आनंद देणारी गोष्ट आहे.