परभणी : जिल्हातल्या जिंतूर येथील पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात गोळीबाराचे प्रशिक्षण घेत असताना पोलिसांचा निशाणा चुकल्याने निसटलेल्या गोळीने एक युवक जबर जखमी झाला आहे. नितीन विष्णू पुंड (16 ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.


जिंतूर शहरापासून 2 किमी अंतरावर मैनापुरी या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणासाठी येतात. शुक्रवारी 11 जानेवारी रोजी प्रात्यक्षिक गोळीबार सुरू असताना दुपारी 2 च्या सुमारास एक गोळी भिंतीच्या वरून सुटली. ती गोळी जालना रोड वरील नवोदय वसतिगृहात जेवत असलेल्या नितीन पुंड या विद्यार्थ्याच्या मांडित घुसली.

जखमी नितीनला उपचारासाठी औरंगाबाद येथील सिग्मा या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता नितीनवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या पायातील गोळी काढून टाकली आहे. परंतु या घटनेत नितीन जबर जखमी झाला आहे.

दरम्यान या घटनेची कोणतीही नोंद जिंतूर पोलिसांत नसल्याची टोलवाटोलवी पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी केली. परंतु जखमी नितीनसोबत पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी सोबत होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे

या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, युवकाच्या मांडीत गोळी आढळली आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. या प्रकरणाची चोकशी सुरू आहे.