पंढरपूर : विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे लागणार आहेत. विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत असून आता घुसखोरी करणाऱ्या VIP साठीही पैसे घेऊन दर्शन देण्याची मागणी केली आहे.

विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेतला आहे.  देशभरातून येणारे बहुतांश उच्च व मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. त्यामुळे या भाविकांना मोफत झटपट दर्शनाचा लाभ मिळतो. यामध्ये काही मंडळी गैरप्रकार करुन पैसे मिळवायचा उद्योग देखील सुरु केला होता.

वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता 330 दिवस रोज सरासरी दोन हजार भाविक हे ऑनलाईन दर्शन घेत असतात.  मंदिराच्या आजच्या निर्णयामुळे यापुढे ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला 8 ते 10 कोटी रुपयाची वाढ होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना काहीच त्रास होणार नसल्याने भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मात्र याचसोबत फुकटची घुसखोरी करुन दर्शनासाठी येणाऱ्या VIP लोकांकडूनही पैसे वसूल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घ्यावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे. या व्यवस्थेतून मिळणाऱ्या पैशांतून विकासकामे करणे मंदिर समितीला शक्य होणार आहे.