लातूर : केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर औसा, देवणी, जळकोटसह अहमदपूर तालुक्यातील दुध उत्पादकांसाठी उदगीर येथील दुग्धभुकटी प्रकल्प हा वरदान ठरला आहे. मात्र, दिवसेंदिवस दुधाचे घटते उत्पादन आणि गडगडलेले दर यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तर परवड सुरूच आहे पण येथील उलाढालही ठप्प आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. बेभरवशाची शेती असल्याने शेतकरी दुग्धव्यवसायावर भर देत आहेत. त्यामुळेच 1979 साली उदगीर येथे या दुग्धभुकटी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. पण या शासकीय प्रकल्पावर दुधाची आवक दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू देखील करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. उदगीर ही लातूर जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे. अहमदपूर, जळकोट, देवणी, शिरूरअंतनपाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा शासकीय दुग्धभुकटी प्रकल्प उभारण्यात आला होता.


सुरवातीच्या काळात 8 ते 10 हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने सर्व काही सुरळीत होते. परंतु, काळाच्या ओघात ना दर बदलला ना येथील प्रक्रिया. तर दुसरीकडे खासगी दुध डेअरीवरील दर दिवसेंदिवस वाढत होते शिवाय दुध उत्पादकांना दूध वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.त्यामुळे या शासकीय दुधभुकटीवर केवळ 2 हजार 300 लिटर दुधाची आवक होत आहे तर प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 6 हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. यामुळेच 26 जून पासून हा प्रकल्प बंद आहे. तांत्रिक करण सांगितले जात असले तरी सर्व मशनिरीचा पुरवठा झाला आहे.पण आवश्यक असलेले दूध दिवसेंदिवस घटत आहे. शिवाय खासगी डेअरी वाढत असल्याने शेतकरी या सरकारी प्रकल्पाकडे फिरकत नाहीत. दुध उत्पादकांनी शासकीय डेअरीकडे वळावे म्हणून विशेष असे प्रयत्न केले जात नाहीत हे विशेष. तूर्त या परिसरातील शेतकऱ्यांना अंबाजोगाई येथील प्रकल्पाचा पर्याय असला तरी उदगीरच्या वैभवात भर टाकणाऱ्या या प्रकल्पाला घरघर लागली हे नक्की..

प्रशासकीय अनास्था
केवळ उदगीर तालुकाच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांना या दुग्धभुकटी प्रकल्पाचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने शेतकऱ्यांची तर गैरसोय होत आहेच पण तालुक्याचा विकास खुंटत आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे. पण आवश्यक असलेले दुध उत्पादन वाढविण्यासाठी कोणतेही पर्याय अवलंबले जात नाही हेच वास्तव आहे.