मुंबई: विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सदस्यांची नेमणूक करताना शिंदे गटाला झुकतं माप देत ठाकरे गटाला डावलल्याचं स्पष्ट झालं असून त्या संबंधित आता ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं गेलं आहे. 


या आधी कामकाज सल्लागार समितीवर सदस्यांची नेमणूक करण्यासाठी ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांकडून पत्र देण्यात आलं नव्हतं. त्यावर शिवसेना हा अधिकृत पक्ष असून या समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्यासाठी आपल्याला निमंत्रण देण्यात यावं अशा आशयाचं एक पत्र देण्यात आलं होतं. पण या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी केराची टोपली दाखवत शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दादा भूसे यांची कामकाज सल्लागार समितीवर नियुक्ती केली होती. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड करण्यात आली आहे. पण विधानसभेमध्ये मात्र वेगळा निर्णय घेण्यात आला. 


शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यानी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं आहे. आता या संबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या वादाचा तिसरा अंक आता सुरु झालेला असून त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याचं दिसून येत आहे. सध्यातरी यामध्ये शिंदे गटाची सरशी होत असल्याचं चित्र आहे. 


या मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि या विषयावर नाराजी व्यक्ती केली. ठाकरे गटच अधिकृत शिवसेना असून त्यांच्या सदस्यांना कामकाज सल्लागार समितीवर घेण्यात यावं अशीही विनंती त्यांनी केली. 


महत्त्वाच्या बातम्या: