मुंबई : ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या पत्राची शिफारस विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली असून त्यांनी शिंदे गटाकडून आलेल्या पत्राला मान्यता दिली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून उदय सामंत आणि दादा भुसे याची कामकाज सल्लागार समितीसाठी नावांची शिफारस करण्यात आली होती. ती विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.


शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये शिवसेना अधिकृत पक्ष असून आपल्याला कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासंबंधी कोणतंही पत्र दिलं नसल्याचं म्हटलं होतं. ही कृती बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचंही या पत्रात म्हटलं होतं. नियमानुसार आपल्याला अधिकृत शिवसेना म्हणून या समितीच्या बैठकीस निमंत्रित करावं असं या पत्रात म्हटलं होतं. 


अशाच आशयाचं एक पत्र शिंदे गटाकडूनही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या पत्राकडे दुर्लक्ष करुन शिंदे गटाची मागणी मान्य केली. शिंदे गटाच्या विनंतीनुसार विधासनभा अध्यक्षांनी उदय सामंत आणि दादा भूसे यांची कामकाज सल्लागार समितीवर नियुक्ती केली. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.


अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्राची कोणतीही दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली नाही. तसेच त्यांनी शिफासरीही ध्यानात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे शिंदे गटामध्ये आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वारंवार खटके उडत असल्याचं दिसून येत आहे. सध्यातरी यामध्ये शिंदे गटाची सरशी होत असल्याचं चित्र आहे.