Nana Patole : गुजराती नेत्यांसाठी असलेलं सरकार जास्त दिवस टिकणार नाही. हे ब्लॅकमेल सरकार आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे जनतेचे सरकार नसल्याचे पटोले म्हणाले. पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते, म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो होतो असेही पटोले म्हणाले. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात 'आझादी गौरव यात्रा' (azadi gaurav yatra) काढण्यात येत आहे. या यात्रेला 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली आहे. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली. या राज्य सरकारमध्ये मलाईदर खात्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचेही पटोले म्हणाले. सध्या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आमची ही आझादी गौरव यात्रा सुरु असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते पदाबाबत बसून निर्णय घेता आला असता
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेले आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळाले आहे. विधानपरिषदेचा नेता आम्हाला हवा होता असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते पदाबाबत बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवले नाही, असेही पटोले म्हणाले. आमची आघाडी ही विपरीत परिस्थीतीमध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले.
शेतकऱ्यांना चांगली मदत द्यायला हवी मात्र, हे सरकार लॉलीपॉप देत आहे
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाडा विदर्भात या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. या मदतीवरुन देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली. या सरकारने शेतकऱ्यांना चांगली मदत द्यायला हवी मात्र, हे सरकार लॉलीपॉप देत असल्याचे पटोले म्हणाले. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी 75 हजार पर हेक्टर मदत द्यायला हवी. विधीमंडळाच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडू असेही पटोले यावेळी म्हणाले.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढवे की नाही याबाबतचा निर्णय कार्यकर्तेच घेतील. आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही करत असेही नाना पटोले म्हणाले. आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते, हे लक्षात ठेवावे असेही पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: