Uddhav Thackeray Vs Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता शिंदेंसह  इतर 40 आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात ठाकरेंचा काय प्लॅन आहे? 
 
एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांच्या विरोधात ठाकरेंचे 40 उमेदवार सज्ज 
उद्धव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदेच्या विरोधात थेट दंड थोपटले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा फैसला सध्या निवडणूक आयोगाच्या कचेरीत सुरु आहे, हा फैसला होईल तेव्हा होईल पण शिंदे सेनेला थेट निवडणुकीच्या रंणागणात चितपट करण्याचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलला आहे. आगामी काळात होत असलेल्या  महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी उद्दव ठाकरेंनी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी रोज मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. विधानसभा मतदारसंघानुसार आढावा घेण्याचं काम सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम करत आहे.  शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 40 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत. या 40  विधानसभा क्षेत्राचा सध्या उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत. गतवर्षीच्या निवडणुकांमधल्या आकडेवारीसह ठाकरे थेट पदाधिका-यांशी चर्चा करत आहेत. एवढच नाही तर मागच्या काही निवडणुकामध्ये कट्टर सैनिकांला तिकिट देता आलं नाही, अशा नाराज व पराभूत उमेदवारावर उद्धव ठाकरेंचं बारकाईनं लक्ष आहे.  
 
उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय आहे ?


मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बंडखोरी झाली आहे. 


या प्रत्येक विभागाची जबाबदारी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे. 


या नेत्यांनी 40 बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बारकाईनं आढावा घ्यायचा आहे. 


याआधी बंडखोर आमदार आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये किती धुसपूस होती, बंडखोर आमदराला कोणता पदाधिकारी टक्कर देऊ शकतो. 


पक्षातल्या नाराज पदाधिका-यांना बंडखोर आमदारांच्या विरोधात ताकद द्यायची व त्यांना पक्षात बडती द्यायची जेणेकरून बंडखोर आमदारांवर ते भारी पडू शकतात.  



उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमला बाऊन्स बॅक करायचा आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे जिल्हा जिल्हा मतदारसंघा एवढंच नाही तर बुथ निहाय स्वतः जातीनं लक्ष घालत आहेत. आगामी निवडणुकीसाठी ठाकरे ॲण्ड कंपनीनं शिंदे फडणवीस सरकारच्या कामांची यादी तयार करायला घेतली आहे. त्यात महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण अग्रस्थानी असणार आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली कामं महाराष्ट्रात पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांवर देण्यात आली आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांचे प्रगती पुस्तक तयार करत आहेत, कारण ठाकरेंना सत्तांतर तर करायचंच आहे पण बंडखोर आमदारांनाही धडा शिकवायचा आहे. भाजप शिंदे आणि मनसे सध्या एकत्र दिसत आहेत. त्यामुळे ठाकरेंसमोरचं हे आव्हान तितकसं सोपं नसणार आहे. उद्धव ठाकरेचं मिशन 40 जरी असलं त्यातल्या काही जागा जिंकण्यावर त्याचा भर असेल पण 40 बंडखोर आमदारांच्या ठाकरे ब्रॅण्ड काय आहे? हे दाखविण्याचा प्रयत्न असेल.