Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक वक्तव्य केलं अन् राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण? यावर चर्चा सुरु झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे मग तो पुरुष असो किंवा स्त्री असं त्यांनी म्हटलं. लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यानं महाराष्ट्रात नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. ही चर्चा म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील महिला कोण?


एकनाथ शिंदेंनी 40 आमदार फोडून उद्धव ठाकरेंची खुर्ची खेचली आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्तेसाठी नवा संघर्ष सुरु झाला आहे. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हटलं की काही मोजकेच चेहरे समोर येतात. त्यातला पहिला चेहरा आहे सुप्रिया सुळेंचा. दुसरा अर्थातच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा आणि तिसरा चेहरा अनपेक्षित आहे. म्हणजे जसे उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री झाले, तशा शिवसेना पक्षप्रमुखांच्या पत्नी रश्मी ठाकरेही स्पर्धेत असू शकतात. त्यामुळे भीमशक्ती, शिवशक्ती आणि लहुशक्तीच्या एकत्रीकरणामुळे महाविकास आघाडीला मिळालेलं बळ कुठल्या महिला नेत्याला मिळणार हा प्रश्न आहे.


सुप्रिया सुळे यांच्या नावाची आधीपासूनच होतेय चर्चा 


शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) गेल्या 15 वर्षापासून राजकारणात सक्रीय आहेत. सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून 3 लाख 36 हजार मतांनी विजयी झाल्या. 10 जून 2012 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनादिनी त्यांनी राष्ट्रीय युवती काँग्रेसचं व्यासपीठ सुरु केलं.  2014 आणि 2019 या दोन्ही वेळा मोदी लाट असतानाही सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून गेल्या. 


पंकजा मुंडे यांचं नावही चर्चेत


सुप्रिया सुळेंनंतर जर दुसऱ्या कुठल्या महिला नेत्याची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा असेल तर त्या आहेत. पंकजा गोपीनाथ मुंडे (Pankaja Munde). दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या. पंकजांनी 2012 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम बघितलं.  2009 मध्ये त्या परळी मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या.  2014 ला दुसऱ्यांदा विधानसभा जिंकून त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ग्रामविकास, महिला बालकल्याण अशी दमदार खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. विशेषत: मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल चर्चा सुरु झाली.


सुप्रिया सुळे आणि पंकजांनंतर तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray). शिवसेनेत रश्मी ठाकरेंकडे कुठलंही अधिकृत पद नाही. मात्र पक्ष आणि पक्षांतर्गत निर्णयांमध्ये त्यांचा असलेला प्रभाव कायम चर्चेत असतो. रश्मी ठाकरेंच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्याची चर्चा होती. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा झाली तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रात आजवर 19 मुख्यमंत्री होऊन गेले, एकनाथ शिंदे विसावे मुख्यमंत्री आहेत.पण या सर्वोच्च पदासाठी महिलांना संधी मिळालेली नाही.


देशाच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान झाल्या. त्यांना भारताच्या आयर्न लेडी म्हणून संबोधलं गेलं. पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताईं पाटील यांनी उत्तम काम केलं. महिलांनी शेताच्या बांधापासून राष्ट्रपती भवनापर्यंत आणि नासाच्या अंतराळयानापर्यंत सगळीकडे गगनभरारी घेतलीय. फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदानं आजवर दिलेली हुलकावणी कुणाच्या दाराशी येऊन थांबते याची उत्सुकता आहे.


ही बातमी देखील वाचा


Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवावी, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी