Chandrashekhar Bawankule : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा (Election Commission Website) सर्व्हर डाऊन असल्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी केली आहे. बानवकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan) यांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र दिले आहे.


 
चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?


राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत. मात्र, सर्व्हरच्या समस्येमुळं फार मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीत. निवडणूक आयोगाची वेबसाईट  चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. अर्ज भरण्याची मुदत उद्या (2 डिसेंबर) संपत आहे. अशा स्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता असल्याचे बावनकुळेंनी पत्रात म्हटलं आहे. 


'या' आहेत मागण्या


1) राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश तातडीनं द्यावा
2) आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळं उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत 3 डिसेंबरपर्यंत करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडं केली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी


निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा सर्वर डाऊन असल्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत आहेत. याबाबत तक्रापी मिळाल्यानंतर  निवडणूक आयोगानं  ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती