मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) सडकून टीका केलीये. मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत मुजरे करायला का जातात, ईर्शाळवाडीची घटना घडल्यावर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री दिल्लीत मुजरा करायला गेले, अशी टीका ठाकरेंनी केली. तसंच, मणीपूर हिंसाचार, गोवंश हत्याबंदी आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. 2024 मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर देशात लोकशाही राहणार नाही, आणि मग देशात पुन्हा निवडणुका होतील असं मला वाटत नाही, असंही ते पुढे म्हणाले. 


'सामना'चे कार्यकारी संपादक, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची 'आवाज कुणाचा' पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता प्रसारित झाला असून दुसरा भाग हा उद्या 27 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे.  निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, 'शिवसेना' हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष


एनडीएच्या बैठकीवर उद्धव ठकरे त्यांनी सडकून टीका केली आहे.   उद्धव ठाकरे म्हणाले,  बऱ्याच वर्षांनंतर या देशात एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपली इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. विरोधी पक्षांनी  'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी आघाडीला उत्तर देण्यासाठी मोदींनी एनडीएची जेवणावळ घातली. 36 पक्षांना त्यांनी एकत्र केलं. खरं म्हणजे त्यांना एवढे पक्ष एकत्र आणण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत.


जी माणसे मनानेच विकली गेली ती माणसं मला नको


उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.  जी माणसे मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान  अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  


महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली


शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली. लोकं म्हणताहेत की, जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


हे ही वाचा :