मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याचं दिसतंय. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. 


शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या विधानसभेच्या जागांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक लढवताना  शिवसेना ठाकरे गट ज्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद आहे ते मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही असेल.  


राज्यातील 120 पेक्षा अधिक विधानसभांच्या जागांचा आढावा ठाकरे गटाच्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास  90 ते 100 जागांवर शिवसेना ठाकरे गट आपले उमेदवार देतील असं ठरवण्यात आलं.  जे मतदार संघ ठाकरेंचे पारंपारिक मतदारसंघ आहेत तिथे संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करावे लागणार असल्याची चर्चा झाली.


ताकदीच्या जागांवर चर्चा झाली


उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत आपल्या नेत्यांकडून  मुंबई, मराठवाडा, कोकणामध्ये जिथे शिवसेनेची प्रामुख्याने ताकद आहे अशा जागांवर चर्चा केली. शिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा संदर्भात चर्चा झाली. आपल्या नेत्यांकडून कुठल्या जागांमध्ये आपली ताकद अधिक आहे ज्या जागा महाविकास आघाडीमध्ये आपल्याकडे असाव्यात याबाबत विस्तृत आढावा घेतला.


गेल्या विधानसभेला जिंकलेल्या जागा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना आघाडी मिळाली आहे त्या जागांचासुद्धा ठाकरे गटाकडून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्या जागा आपल्या पक्षाकडे  मागण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. 


एकीकडे महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे 288 विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरे गटाची आगामी काळात रणनीती ठरवली जाईल. 


महाविकास आघाडीकडून पदाधिकारी मेळावा


मुंबईत महाविकास आघाडीच्या एकत्रित होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यानंतर लवकरच महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्मुलावर अंतिम निर्णय होणार आहे. 


महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण  लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही चांगलं यश मिळवू शकतो, हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाच्या सूत्रसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे.  


ही बातमी वाचा: