Maharashtra News : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली. त्यानंतर घडल्या प्रकारासंदर्भात उद्धव ठाकरेंनी ठाणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले पण त्यांची भेट होऊ शकली नाही. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील तपास सुरू करू, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.


ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदे यांची विचारपूस करुन त्यांना दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रोशनी शिंदे यांना आयसीयूमध्ये दाखल करणं हा दिखावा आहे, त्या गर्भवती नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. परंतु त्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी ठाण्यात येणं, रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेणं हा राजकारणचा भाग आहे, असंही शिवसेनेने म्हटलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस करणं यावरुन असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला की, ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ते मागे खंबीरपणे उभे आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 




उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तालयात पोहोचले, पण...


या भेटीनंतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तालयात पोहोचले. परंतु इथे पोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती राजन विचारे यांनी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे ठाण्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार असून या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.


मुका मार आहे, रक्तस्राव नाही : डॉक्टर


डॉक्टरांच्या माहितीनुसार, "काल रात्री साडेदहाच्या दरम्यान रोशनी शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल केलं. आपल्यावर काही जणांनी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक उपचार सिव्हिल रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी माझ्या रुग्णालयात दाखल झाल्या. क्लिनिकल तपासणीत शरीरावर मारहाणीच्या हलक्या खुणा होत्या. पूर्णत: तपासणी केली असता रक्तस्राव झाल्याचं दिसत नाही. पाठीवर मुका मार आहे. काल रात्री आणि सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने सोनोग्राफी करण्यात आली, तिथे रक्तस्राव नसल्याचं दिसून आलं. तसंच कुठेही फ्रॅक्चर नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."


फेसबुक पोस्टवरुन राडा


फेसबुकवरील पोस्टवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


अद्याप गुन्हा नाही


या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी म्हटलं होतं. गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. या प्रकरणावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा वादही समोर येत आहे.


मुख्यमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक


दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची इंत्यंभूत माहिती घेण्यात आली.