धाराशिव : इतरवेळी शुल्लक वाटणाऱ्या माणसांपुढे तुम्ही आता का झुकत आहात? मतांची भीक का मागत आहात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील विराट सभेत मतदारांना साद घातली. तुम्ही आता सिंघम व्हा आणि म्हणा आली रे आली, आता माझी पाळी आली, आता माझी सटकली, आता तुला सटकवणार असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच समोरी जनसमुदायातून तुफान प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीत 13 मतदारसंघांमध्ये ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोरआहेत. पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका मोठ्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होत असल्याने चुरस वाढली आहे.
तुम्ही महाराष्ट्रात देशावर संकट बनून आला आहात
धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती. या गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या आजारपणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार रात्री गळाभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे ठरवत होते. पंतप्रधान मोदी तुम्हालाही माहित नव्हतं का? आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांच्यावर कधी काही संकट आले तर मी धावून जाईन. ठीक आहे, मोदींवरील संकट आलं तर मी देखील धावून जाईन. तुम्ही महाराष्ट्रात देशावर संकट बनून आला आहात, त्यावर आवर घाला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.
ते पुढे म्हणाले की, मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा ते माझी चौकशी करायची, विचारपूस करायचे मग हे जर खरं असेल, तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
2014 मध्ये उद्धव ठाकरे कोण हे माहीत नव्हते का?
मी बाळासाहेबांचे विचार सोडले असे मोदीजी म्हणाले. 2014 मध्ये मी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईला परतलो आणि एकनाथ खडसे यांचा फोन आला आणि युती तोडत आहोत असे त्यांनी सांगितले. वरूनच आदेश आला असे खडसे म्हणाले. युती तोडणाऱ्यांच्या निर्णयाबद्दल मोदीजी तुम्हाला माहिती नव्हते का? 2014 मध्ये हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहीत नव्हते का? माझ्यावर शिवसेनाप्रमुखांचे कर्ज आहे असेही मोदीजी म्हणाले. मग त्या शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून अमित शाहांनी मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, तुम्हाला हे माहीत नव्हते का? मी तर तुळजाभवानीची शपथ घेऊन जे त्या खोलीत घडले ते जनतेला सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द तुम्ही मोडलात आणि खोटे मला ठरवलात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या