Uddhav Thackeray :  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकमेकांना शाब्दिक चिमटे काढले. उद्धव ठाकरे मविआ नेत्यांसोबत चर्चा करत असताना हा किस्सा घडला. 


नेमकं काय झाले?


उद्धव ठाकरे हे विधिमंडळात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा सुरू होती. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी उपस्थित होते. 


उद्धव ठाकरे हे इतर नेत्यांशी चर्चा करत असताना मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव यांना सर...सर...म्हणत पुढील नियोजित कार्यक्रमासाठी जायचे असल्याचे खुणावले. त्यावेळी जयंत पाटील यांनी मिलिंद नार्वेकर यांना अडवले आणि सारखं साहेबांना (उद्धव ठाकरे) गडबडीत नेणे बंद कर, जरा आमच्यासोबतही त्यांना बसू दे असे म्हटले. आम्ही काही आग्रह केला तर सर...सर...म्हणत त्यांना नेत असल्याचे पाटील यांनी म्हटले. त्यावर मिलिंद नार्वेकर यांनी तुम्ही सगळेजण मिळून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर मी होऊ देणार नसल्याचे नार्वेकर यांनी म्हटले. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा उमटला. 



उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल 


शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी अदानी रिएल्टी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावरून झालेल्या टीकेला उद्धव यांनी उत्तर दिले. मला आता कळलं अदानींचे चमचे कोण आहे. आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? मी धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप असती तर सेटलमेंट झाली असती पण ते नव्हते असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :