Uddhav Thackeray On Disha Salian : सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणी राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष चौकशी पथकाकडून (SIT) पुन्हा चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपकडून (BJP) दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले जात असताना आज पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे. ज्या प्रकरणात काहीच पुरावे नाहीत, त्यावर एसआयटी लावली जाते. मात्र, आम्ही जे पुराव्यांसह मांडतोय, त्यावर एसआयटी लावली जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुती, भाजपवर टीका केली. ठाकरे यांनी म्हटले की, अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हाच, अधिवेशन तेव्हाच मनात पाल चुकचुकली की अधिवेशन वेगळ्या ठिकाणी जातंय. ज्यांचा दुरान्वयेही एखाद्या घटनेशी संबंध नाही, अशा प्रकरणातही एसआयटी चौकशी लावली जाते. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे, दिलेल्या पुराव्यांविरोधात एसआयटी लावली जात नसल्याची टीका ठाकरे यांनी केली.
अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नाही. त्यांच्याबद्दल एसआयटी चौकशी का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
काय आहे दिशा सालियन प्रकरण?
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसंनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला.
एसआयटीमध्ये कोणते अधिकारी?
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी एसआयटीसंदर्भात सरकारकडून लेखी आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिलेत. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.