Uddhav Thackeray Speech :  मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. एकीकडे शीवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. त्यामुळे मुंबईच्या मैदानांवर आज प्रचार सभांचा आवाज घुमला. महायुतीच्या सभेमध्ये राज ठाकरे, पंतप्रधान मोदी यांची उपस्थित होती. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच इंडिया आघाडीच्या सभेमध्येही  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) यांनी जोरदार भाषण केलं. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे. 


1. महायुतीच्या सभेवर निशाणा


एका बाजूला आपण सगळे आलेलो आहोत. दुसऱ्या बाजूला सगळे गद्दार, नकली, आणि भाडोत्री माणसं. वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, मला असं कळलं की लोकंही तिथे भाडोत्री आणली आहेत. इथे एकाने हात वर्ती करुन सांगा की कोणी भाड्याने आणलं आहेत. 


2.  'देश डि-मोदी-नेशन करायचाय'


 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


3. चीनचा मुद्दा


चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय. पण हे भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आले आहेत. मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करुन पाहा. माझा महाराष्ट्र तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही. हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा होऊ देणार नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, माझा मर्द मराठा फुटणार नाही. 


4. 'अबकी बार भाजप तडीपारचा नारा'


काही वेळेला एक गोष्ट बरी असते. निसर्गाचा नियम आहे. सडलेली पानं झडली पाहिजेत. त्याशिवाय पालवी फुटत नाही. भारतीय जनता पक्ष कचरा गोळा करणार पक्ष आहे. त्यांनी 400 पारचा नारा दिला. मग आपण नारा दिला अबकी बार भाजप तडीपार तुमच्यावर कोणत्या घराण्याचे संस्कार आहेत, माहिती नाहीत. तुमचे दरवाजे बंद करून आम्ही तुम्हाला गुजरातला पाठवून देऊ. कोविडमध्ये मी मोदी शहा सांगत होतो उत्तर भारतीय लोकांना रेल्वेने पाठवू द्या. मात्र हे नाही नाही म्हणत होते. लोकांना जमेल तस आम्ही थांबवत होतो.


5.  घराणेशाहीचा मुद्दा


घराणेशाहीची मु्द्दा काढला,त्यांना वाटलं उद्धव ठाकरे गप्प बसले. मला मोदींजींचं घराणं माहित नाही, पण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं, त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात, त्या मातीत औरंगजेब जन्माला. आज तुम्ही जसं गल्ली बोळात फिरताय, तसंच औरंगजेबही छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी 27 वर्ष महाराष्ट्रात फिरला. पण तो पुन्हा आग्रा पाहू शकला नाही, त्याला याच मातीत गाढला. 


6. घाटकोपर होर्डींगचा आणि पंतप्रधान रोड-शोचा मु्द्दा


जिथे दोन दिवसांपूर्वी होर्डींग कोसळून काही जणांचा मृत्यू झाला. त्यांचं रक्तही सुकलं नव्हतं, तिथूनच तुम्ही ढोल-ताशे बडवत, लेजीम खेळत स्वत:चा रोड शो केलात. तुम्ही एवढे निर्दयी झालात. ज्या शिवसनेने तुम्हाला कठिण काळात मदत केलीत, त्याच शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. 


7. हुकुमशाह म्हणून उल्लेख


मी जिथे जिथे जातोय, तिथे तिथे गर्दी होतेय. लोकं समोरुन सांगतायत की उद्धवजी लढा तुम्ही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, फक्त या हुकुमशाहाला गाढा तुम्ही. हे स्वत:ची लढाई लढण्यासाठी आलेले नाहीयेत.


8.  शेतकऱ्यांचा मुद्दा


नाशिकच्या सभेमध्ये जेव्हा मोदींजींनी हिंदू-मुसलमान सुरु केलं, तेव्हा समोरचा एका शेतकऱ्याने उठून म्हटलं की, कांद्यावर बोला. तेव्हा मोदींची नजर हुकूमशाह सारखी होती. एक शेतकरी तुमच्याकडे मदत मागतोय,हमीभाव मागतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही भारतमाता की जय म्हणता. मग मोदीजी तुमची भारतमाता आहे तरी कुठे. माझी भारतमाता माझ्यासमोर आहे, कांदा उत्पादक शेतकरी माझी भारतमाता आहे.


9. हिंदू-मुस्लिम मु्द्दा


मोदीजी म्हणाले होते की, ज्याक्षणी मी हिंदू-मुस्लिम मुद्दा भेद करेन त्यावेळी मी राजकारणाचा त्याग करेन. मग तर मोदीजी तुम्ही राजकारणाचा त्याग कधीच करायला हवा होता. तुम्ही एकतर यांना घुसखोर म्हणता, यांना देशद्रोही ठरवता. तुम्ही म्हणता माझं बालपण मुस्लिम कुटुंबासोबत गेलं होतं, ईदच्या दिवशी घरी स्वयंपाक व्हायचा नाही. मग  खालेल्या मिठाची जान ठेवा.  


10. मराठी-गुजराती मुद्दा


मुंबईमध्ये तुमच्या कंपन्या दादागिरी करतात. मराठी माणसाला प्रवेश नाही म्हणतात. मी गुजरात्यांविरोधात नाही. मी कालच तुषार गांधींना सांगितलं की, गुजराती देखील आमचेच आहेत. मराठी माणसाला जर तुम्ही प्रवेश दिला नाही, तर तुमचे दरवाजे आम्ही बंद करु आणि गुजरातला पाठवू. मुंबईत आम्ही गुजराती, मराठी, मुसलमान गुण्यागोविंदाने राहतोय, त्याच मीठाचा खडा टाकू नका. 



ही बातमी वाचा : 


Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे