Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यामध्ये महायुती आणि इंडिया आघाडीकडून महाराष्ट्रामध्ये जोरदार ताकद लावण्यात आली आहे. आज (17 मे) महाराष्ट्रामध्ये प्रचाराची सांगता होत असल्याने मुंबईमध्ये एक प्रकारे दोन्ही आघाड्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. मनसेनं आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराची सांगता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आहेत, तर इंडिया आघाडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आपचे खासदार संजय सिंह आदी नेते मुंबईमध्ये पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात सभेला पोहोचतील. दोन्ही सभांमधून नेते कोणत्या फैरी झाडणार? याकडे सुद्धा लक्ष असेल.
अजित पवार व्यासपीठावर प्रकटले
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे चर्चा होती. 11 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार हे जाहीर कार्यक्रमांमध्ये किंवा सभांमध्ये दिसून आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार गायब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, आज (17 मे) होत असलेल्या सभा प्रचार सांगता सभेमध्ये अजित पवार व्यासपीठावर प्रकटले आहेत.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गायब असल्याची चर्चा होती, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यांनी अप्रत्यक्षरित्या बारामतीमध्ये शरद पवारांविरोधात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्याची कबूली दिली आहे का? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर अजित पवार अंतर राखून होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याची चर्चा होती. मात्र, आज त्यांनी व्यासपीठावर हजेरी लावत सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या