मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दहा लाख हजार पत्रे पाठवली जात आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज उस्मानाबाद येथील मुख्य टपाल कचेरीतून दहा लाखांतील दोन हजार पत्रे पाठवण्यात आली आहेत.  


यासंदर्भात बोलताना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर म्हणाले, "राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यातील विद्यापीठांमध्ये स्वतः साठी प्र. कुलपती हे महत्त्वाचे पद आर्थिक लाभ घेण्याच्या हेतूने निर्माण करू पाहत आहेत. या पदाचा वापर करून विद्यापीठाच्या जमिनी लाटण्याचा ते प्रयत्न करत आहेत. याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांना दहा लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याबरोबरच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्याच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले जाणार आहे."


"भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या या सर्वांमध्ये आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परीक्षांप्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र. कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत.
या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा या कायद्याला विरोध करत आहे" अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी  दिली. 


काय आहे विद्यापीठ सुधारणा कायदा?


हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर झालेले महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा विधेयकानुसार राज्याचे उच्च आणि  तंत्रशिक्षण मंत्री राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्र. कुलपती असतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कुलपतींच्या अनुपस्थितीमध्ये दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. प्र कुलपती विद्यापीठाच्या विद्या विषयक व प्रशासकीय कामकाजाच्या संबंधित माहिती मागू शकतील. प्र - कुलपती हे कुलपतीने अधिकार प्रदान केलेली कर्तव्य पार पडतील.


महत्वाच्या  बातम्या


Uday Samant: विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाबाबत गैरसमज पसरवला जातोय- उदय सामंत 


राज्यपालांचे अधिकार कमी होणार; विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर