बेळगाव : बेळगावात वडगांव पोलिसांनी दोन आंतरराज्य दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 48 लाखांचे सोन्याचे दागिने आणि कार असा एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकाश विनायक पाटील (वय 30 वर्षे) रा.सरस्वती नगर ,शहापूर सध्या राहणार साखळी गोवा आणि नितै खलीपद मंडल (वय 24 वर्षे) रा.कोलकाता अशी अटक केलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांची नावे आहेत.


काही दिवसांपूर्वी झडशहापूर येथे दिवसाढवळ्या चोरी करुन जाताना पोलिसांनी त्यांना पकडले होते. नंतर त्यांना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी वडगांव ग्रामीण, एपीएमसी, कॅम्प, मरीहाल, माळ मारुती पोलीस स्थानकात घरफोड्या केल्याचे कबूल केले. तसेच अन्य राज्यांतही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 848 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि चोऱ्या करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.


पोलीस आयुक्त डॉ. के त्यागराज, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आणि गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त नीलगर, सहायक पोलीस आयुक्त जी. वाय. गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव ग्रामीण पोलिस स्थानकाचे सुनीलकुमार नंदेश्वर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.