नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अनेक राजकारणी, अधिकारी, साहित्यिक, उद्योजक यांना एकत्र आणणारा महाराष्ट्र महोत्सव पार पडणार आहे.

पुढचे पाऊल या दिल्लीतल्या मराठी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या विचारमंचाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा दोन दिवसांचा कार्यक्रम पार पडणार आहे.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या हिताच्या विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, सुरेश प्रभू यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

पुढचे पाऊल या विचारमंचाचे संस्थापक आणि सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातल्या औद्योगिक संधी, त्यातली आव्हाने, मराठी महिलांची उद्योजकता या विषयांवर यात मंथन होणार आहे. कवितांची, गाण्यांची मैफल असे इतर सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी असणार आहेत.

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात हा महोत्सव पार पडणार असून यावेळी पुढचे पाऊल या वेबसाईटचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असं आयोजकांनी सांगितलं.