Nashik News नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांच्या (Mumbai-Nashik Highway Accident) दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी (Igatpuri) बायपास जवळील बोरटेंभे येथे घडली. एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 


नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (new Year 2023) पहाटे ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोरटेंभे येथे भरधाव वेगातील मर्सिडीज कारने(क्र. MH 02 EX 6777) भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली.


यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी यांनी मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 


गाडीचे टायर पंक्चर झाल्याने अपघात; पाच जखमी


दुसरी घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी (Pachapakhadi Accident News) भागात घडली. सोमवारी सकाळी गाडीचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 


मुंबई नाशिक महामार्गावरून सोमवारी सकाळी टाटा सुमो ही गाडी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होती. सकाळी ७ वाजताच्या सुमारास मोटार पाचपाखाडी भागात आली असता, मोटारीचे मागील चाक पंक्चर झाले आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांची मोटार रस्त्याकडेला विटांनी भरलेल्या एका टेम्पोला धडकली. यात मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.


जखमींची नावे अशी


फय्याज शेख (51), विकास कुमार (21), शिवशंकर विक्रम आदित्य (33), संतोष कुमार (24) आणि प्रदीप प्रसाद (25) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील संतोष कुमार आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ahmednagar News :  नगर-दौंड महामार्गांवर ट्रक आणि झायलो कारचा अपघात; अपघातात 3 ठार 8 जखमी