Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील चांदणी चौकाच्या (Chandani chowk) पुलाचं पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे  (Pune Rain) आणि त्या पुलावर असलेल्या पाण्याची पाईपलाईन वळवण्याच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आलं आहे. त्याशिवाय या पुलावर असलेल्या सगळ्या सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल पाडण्यासाठी किमान आठ दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. 


चांदणी चौकातील या पुलावर अनेक सेवावाहिन्या आहेत. महापालिकेच्या माध्यामातून यातील काही सेवा वाहिन्या काढण्यात आल्या आहेत किंवा काही वळवण्यात आल्या आहेत. ज्या वाहिन्यांचं काम शिल्लक आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूल पाडता येणार नसल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. 
 
18 सप्टेंबरला पाडण्यात येणार होता पूल
येत्या 18 सप्टेंबरला हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूल पाडण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. पुलामध्ये स्फोटकं भरण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली होती. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. काही दिवस त्या मार्गावरुन पुणेकरांना प्रवास करावा लागणार आहे.


Edifice engineering या कंपनीची निवड
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी नोएडातील ट्विन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.


राडा रोडा हटवण्यासाठी लागणार 10 तास
पूल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींमध्ये स्फोटकं भरण्याचं काम सुरु झालं आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रिलिंग करुन होल्स पाडण्यात येत आहेत. स्फोटानंतर अवघ्या आठ ते दहा सेकंदांमध्ये हा पूल जमीनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक (Traffic) कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.