गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2019 09:02 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोट प्रकरणी अटकेतील आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती आहे
गडचिरोली : महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंगस्फोटाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. कैलास रामचंदानी असं आरोपीचं नाव आहे. 30 एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात 15 पोलिस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना अचानक मोठे यश मिळाले. सुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती.