नाशिक : नाशिक जिल्ह्यातील टाकळी विंचुर हे लहानसं गाव सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर पसरलेल्या एका अफवेमुळे हे गाव रातोरात जगभरातल्या नेटीझन्सच्या ओळखीचं झालं.


 
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल साईट्सवर एक बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या गावातल्या एका शेतकऱ्याने नवी कोरी रेनॉल्ट डस्टर कार घेतली. एका महिन्यात पाच वेळा नादुरुस्त झालेली ही कार कंपनीने वारंवार तक्रार करुनही ना दुरुस्त करुन दिली, ना बदलून दिली. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने ही कार ग्रामपंचायतीला दान करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही नवी कोरी रेनॉल्ट डस्टर कार फक्त गावचा कचरा उचलण्याच्याच कामी वापरायची अशी अट घातली.

 
या बातमीने 6 हजार लोकवस्ती असलेल्या या लहानशा गावाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली आणि जगभरातल्या नेटीझन्सचं मनोरंजन केलं. पण या व्हायरलमुळे कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली. डस्टर कंपनीची मोठी बदनामीही झाली.

 
'एबीपी माझा'ने नाशिक जिल्ह्याच्या कोपऱ्यात असलेलं हे लहानसं खेडेगाव गाठलं आणि या व्हायरल बातमीतलं सत्य जाणुन घेतलं. प्रत्यक्षात अशी कुठली घटनाच या गावात घडलेली नाही. इतकंच काय तर गावात कुणाकडे श्रीमंतांची सवारी म्हणवली जाणारी ही डस्टर कारच नाही तर ती दान
देण्याचा प्रश्नच नाही असं सत्य सरपंचांनी सांगितलं.

 
सोशल नेटवर्किंग साईट्सचा वाढता वापर आणि स्वातंत्र्याचा गैरवापर केला तर कशी बदनामीही होऊ शकते, हेच या निमित्तानं समोर आलं.