नवी मुंबई/कोल्हापूरः सरकारशी वाटाघाटी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदीला सुरुवात केली. पण शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत जेव्हा लहान व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचा मुद्दा आला, तेव्हा अचानकपणे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला.


 

 

त्यामुळं सकाळच्या काळात नवी मुंबई, दादर, कोल्हापूर आणि नाशिकच्या बाजार समितीत गदारोळ सुरु होता. अखेर व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वाटाघाटींनंतर बंद मागे घेऊन शनिवारपर्यंत शेतकऱ्यांकडून आडत न घेता खरेदीला सुरुवात झाली. मात्र तरीही कोल्हापूर आणि दादर बाजारातील व्यापारी मात्र बंदवर ठाम आहेत.

 

व्यापाऱ्यांचा आडमोठेपणा कायम

व्यापाऱ्यांचा संप मिटला म्हणून शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला, तोवर नवं संकट उभं राहिलं. मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी 8 टक्के आडत वसुलीला विरोध केला, आणि खरेदी बंद केली. कालपर्यंत शेतकऱ्याकडून वसूल होत असलेली अडत आमच्या माथी मारु नका, असा आडमुठा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

 

नवी मुंबई एपीएमसीमध्ये दर दिवशी 700 ते 800 ट्रक भाजीपाला येतो. तेथून लहान व्यापारी तो खरेदी करुन मुंबईत आणतात त्यासाठीची वाहतूक, हमाली आणि तोलाई छोट्या व्यापाऱ्यांना द्यावी लागते. तसंच बाजार समितीला सेससुद्धा भरावा लागतो.

 

व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक

मुंबई पालिकेत भाजी आणताना 12 टक्के सेवाकर द्यावा लागतो. भाजी मंडईत जागेचं भाडंही छोट्या व्यापाऱ्याला द्यावं लागतं. त्यात 8 टक्के अडतीची भर पडली तर ग्राहकाला भाजीपाला महाग मिळेल असं, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ग्राहकांची चिंता असल्याची नाटकं करणारे व्यापारी शेतकऱ्याला कसे नाडतात त्याचा अनुभव बाहेरुन शेतमाल विकायला आणलेल्या शेतकऱ्यांना येत आहे.

 

 

जे रडगाणं व्यापारी गातात, तेच दुखणं शेतकऱ्याचं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. त्याचं गाडीभाडं, हमाली, तोलाई याचा भार शेतकऱ्यालाही उचलावा लागतो. शिवाय भाव पाडून खरेदी करणं आणि रुमालाखालचे व्यवहार वेगळाच भाग.

 

 

अध्यादेश काढून आडत शेतकऱ्याकडून घेऊ नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तरीही नाशवंत माल बाजारात आणल्यावर शेतकऱ्याला नाडलं जात आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत? हा प्रश्न आहे.