रत्नागिरी : कोरोनाचं संकट अद्याप देखील टळलेलं नाही. त्यामुळे नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना नियम पाळणं बंधनकारक आहे. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू आहे. त्यानंतर आता महाबळेश्वर आणि रायगडसारख्या ठिकाणी देखील परिस्थितीचा सारासार विचार करता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी काही फार्म हाऊसवर पोलिसांची नजर असणार आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये कर्फ्यू असल्याने अनेकांनी नगरपालिका क्षेत्रांकडे आपलं लक्ष केंद्रीय केलं आहे. अशी वेळी सौदर्याने नटलेला आणि निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला रत्नागिरी जिल्हा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.



अथांग असा समुद्र, मंदिरं, प्रसिद्ध अशी ठिकाणी, डोंगरदऱ्यांमधून वसलेली टूमदार गावं आणि सर्वत्र हिरवाई असं वातावरण सध्या जिल्ह्यात असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. दरम्यान, नाताळ, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि नागरिक देखील सज्ज झाले आहेत. राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणं असल्याने सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे. कोरोनाकाळानंतर सर्व सुखसोयींनीयुक्त अशी जिल्ह्यातील ठिकाणं आहेत.



काय असणार नियम?
सारी परिस्थिती पाहता जिल्ह्यात अद्याप तरी कोणतेही कडक असे निर्बंध नाहीत. पण, येणाऱ्या पर्यटकांनी, व्यापाऱ्यांनी आणि स्थानिकांना कोरोनाकाळातील नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कुणीही हलगर्जीपणा करु नये, असं आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचीही जबाबदारी आणखी वाढते. जिल्ह्यातील हॉटेल आणि लॉजिंग देखील या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. दरम्यान, नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. ही बाब सर्वांना ध्यानात घ्यावी लागणार आहे.



ण, काळजी घ्या!
पर्यटकांनो तुमचं कोकणात स्वागत आहे. पण, यावेळी काळजी देखील घ्या. कोकणातील समुद्रकिनारे खोल आहेत. उत्साहाच्या भरात पाण्यात जाताना त्याठिकाणचा अंदाज घ्या. स्थानिकांचं, सदर ठिकाणी लावलेल्या सुचनांचं पालन करा. नवीन वर्षाचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात गालबोट लागणार नाही याची काळजी. तसेच आता वॉटर स्पोर्टचा मार्ग देखील मोकळा झालेला असल्याने पर्यटकांना त्यांचा सुट्टीचा काळ आणखी एन्जॉय करता येणार आहे.