अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या एका भन्नाट आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा" असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील तब्बल 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर आणखी 10 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.


आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला सर्वात पहिले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत प्रतिसाद देत बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता तीस ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकोपा टिकवण्यासाठी सर्व घटकांना समान न्याय देऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध करा,तुमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असेल, असं देखील आवाहन आमदार निलेश लंके यांनी फेसबुकवर देखील केलं होतं.


संपूर्ण राज्यात येत्या 15 जानेवारी पासून राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या काळात गावागावात भांडणं, मतभेद, कलह निर्माण होऊ नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवत अनोखे आवाहन गावकऱ्यांना केले. "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी घ्या" असे आवाहन लंके यांनी केले. या आवाहनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाने सर्वात पाहिले प्रतिसाद दिलाय. राळेगण सिद्धी गावात अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गावात 2 गट असतानाही गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.


राळेगण सिद्धी गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गावात जाऊन बिनविरोध निवडणूक लढवण्याचे फायदे सांगितले आणि आमदारांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आज पारनेर मधील घोसपुरी गावाने देखील बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. घोसपुरी हे पारनेर मधील 30 वे गाव आहे ज्याने हा निर्णय घेतलाय. पारनेर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 30 गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.


आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला सर्वात पहिले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत प्रतिसाद देत बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता तीस ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.