Aaditya Thackeray on Rahul Kanal IT Raid : ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी सुरु असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण आहे, असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले आहेत. निवडणुका आल्यानं छापेमारी सुरु असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. तर, भाजपला महाविकास आघडीची भीती वाटतेय, असंही ते म्हणाले. 


पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रावर आधीदेखील आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणंच आहे. आपण पाहत असाल, गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा निवडणूक लागेल असं कळालं आणि महाविकास आघाडीची भाजपला भिती वाटायला लागली, तेव्हापासूनच असं सुरु आहे. हे युपीमध्ये देखील केलेलं. हैद्राबादमध्येही केलंय. बंगालमध्येही केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत. म्हणून इथे सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही."


पाहा व्हिडीओ : केंद्रीय संस्था भाजपची प्रचार यंत्रणा झाली, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही : आदित्य ठाकरे 



आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी


पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच, परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या रडारवर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :