त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे आज निधन झालं. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.
शनिवारी मोहसीन बागवान या तरुणाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर मोहसीनला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. आत्महत्या करण्यापूर्वी मोहसीन बागवान याने लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून यामध्ये त्याने माजी नगरसेवक साजिद अली पठाण आणि त्याचा भाऊ बबलू पठाण यांच्याकडून 20 टक्क्यांनी 50 हजारांचे कर्ज घेतले होते.

या कर्जापोटी आपण 1 लाख 75 हजार रुपये दिले असताना पुन्हा पठाण बंधूकडून पैशांसाठी तगादा लावून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिठ्ठीमध्ये नमूद केला आहे.
यानंतर मिरज पोलिसांनी साजीद पठाण यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र त्यावेळी पठाण बंधू हे हाती लागू शकले नव्हते. तर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बागवान यांची प्रकृती खालावल्याने आज बागवान यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच मिरज पोलिसांनी माजी नगरसेवक साजिद पठाण याला ताब्यात घेतले आहे.