मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती
छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून खासदार सुप्रिया सुळे आणि ना. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच नाशिकमध्ये शंभू मुद्रेची प्रतिकृती साकारली जाणार आहे. तसेच राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती शिवसेनेकडून जल्लोषात साजरी होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नशिकमध्ये शंभू मुद्रेची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 450 किलो वजनाची, 16 फूट उंच 12.5 फूट रुंद फायबर पासून बनवलेली प्रतिकृती आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय.
उद्धव ठाकरेंची आज बीकेसीवर सभा
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीमध्ये सभा आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. घर पेटवणारं नाही, तर चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे असे शिवसेनेने पोस्टर्स लावले आहेत.
उद्धव ठाकरे आज विरोधकांचा समाचार घेणार आहेत, तसं त्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. एमआयएमचा औरंगाबादचा मुद्दाही चर्चेत आला आहे. यावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत.
काँग्रेस चिंतन शिबिराचा आजचा दुसरा दिवस
राजस्थानमधील उदयपूरल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर सुरू असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेस आला आहे. कायम सक्रिय असलेल्या नेत्याकडे अध्यक्षपद असायला हवं अशी मागणी अनेकांनी केली. राहुल गांधी यांच्या नावाचाही काही नेत्यांकडून पुनरुच्चार करण्यात आला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही काँग्रेस पक्षाची अंतर्गत चर्चेची फेरी सुरू राहणार. आज पी. चिदंबरम, भूपिंदर सिंग हुड्डा आणि सलमान खुर्शीद यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा होतील.
दिल्लीतील इमारतीला मोठी आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू
दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला मोठी आग लागली आहे. या आगीत इमारतीतील 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आजही या ठिकाणचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अनूसुची जाहीर
महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
राणा दाम्पत्याचं दिल्लीतही हनुमान चालीसा पठण
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण करणार. राणा दांम्पत्य घरापासून मंदिरापर्यंत पायी जाणार. सकाळी 8.30 वाजता हे हनुमान चालीसा पठण करण्यात येणाार आहे. खासदार नवनीत राणा यांना प्रतिउत्तर देण्यासाठी अमरावती शिवसेनेने त्याच वेळी राणा यांच्या मतदारसंघातच महाआरती आयोजित केली होती. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या 13 मंत्र्यांची मांदियाळी
नांदेड येथे महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत यांच्यासह तब्बल 13 मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या "सहकार सूर्य"या गोदावरी बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उदघाटन – सकाळी 11 वाजता.
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम. वेळ- सायंकाळी 5 वाजता.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. पहिल्यांदाच गृहमंत्री नांदेडात येऊन आढावा घेत आहेत. बियाणी यांची हत्या, मराठवाड्यात वाढलेली गुन्हेगारी यासह कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील उजनीचा पाणीप्रश्न पेटला, आज आंदोलनाची दिशा ठरणार
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेल्या या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कुर्डूवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे आयोजन
फिक्की, केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होईल. भारताला येणाऱ्या काळात क्रूझ हब विकसित करण्यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ –हॉटेल ट्रायडेंट, नरीमन पॉईंट, मुंबई. वेळ - सकाळी 10 वाजता
केतकी चितळेची शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट खाली ॲड. नितीन भावे यांनी ती पोस्ट लिहील्याचा उल्लेख आहे. यावरून आता वाद निर्माण होऊ शकतो .
वाराणसी ज्ञानवापी प्रकरणी सर्व्हेक्षणाचे व्हिडीओग्राफीचे काम आजपासून
वाराणसीतील ज्ञानवापी -श्रृंगार गौरी प्रकरणात कोर्ट कमिशनरकडून सर्वेक्षणसाठी व्हिडिओग्राफीचे काम आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वेक्षणाची वेळ न्यायालयाने निश्चित केली आहे. तसेच याचा अहवाल 17 मे रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे.