Palghar Otter: पालघरच्या सूर्या नदी पात्रात मासवन गावच्या हद्दीत दुर्मिळ पाणमांजराचा वावर आढळून आला आहे. यामुळे सूर्या नदी प्रदूषणापासून मुक्त आणि नदीत प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास टिकून असल्याचे समाधान पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे. सूर्या नदी पात्रात स्फोटकं आणि कीटकनाशकांचा वापर करून अवैध मासेमारी केली जात असल्याने भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित पाणमांजराचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


स्तनवर्गाच्या मांसाहारी गणातील मुस्टेलिडी कुळातला हा प्राणी आहे. पाणमांजराला इंग्लिश नाव आहे ऑटर. हा प्राणी लुट्रा वंशाचा असून त्याचे शास्त्रीय नाव लुट्रा पपिसिलेटा आहे. भारतात हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रह्मदेश इंडोचायना आणि मलायात आढळतो. त्याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर पाणमांजराचे वास्तव्य आढळते.


पाणमांजराचे भक्ष्य नदीतील मासे आणि खेकडे असतात. त्याचे बिळ नदी किनाऱ्यावर असते. काही वेळा किनाऱ्यावरील दगडांच्या मोठ्या खाचा किंवा मोठ्या झाडांच्या पसरलेल्या मुळांच्या विस्तीर्ण छायेतही पाणमांजर वास्तव्य असते. मासे आणि खेकड्याखेरीज बेडूक, कासव, नदीतील साप, सरडे आणि क्वचित प्रसंगी नदीजवळील पक्षीदेखील त्यांचे भक्ष्य असते. पाणमांजराचा खाद्य आवाका मोठा आहे. नदी पात्रात मोठ्या चपळाईने माशांचा पाठलाग करून माशांची शिकार करणारे पाणमांजर मनुष्याच्या हाती सहसा लागत नाही. सामाजिक प्राणी आणि टोळीत फिरत असल्याने मगरी देखील शक्यतो पाणमांजराच्या वाटेला जात नाही. त्यामुळे पाणमांजर नदी परिसंस्थेत सर्वोच्च भक्षक असतात. कोणत्याही अधिवासाच्या अन्नसाखळीत विविध प्राणी, जीवजंतू व वृक्षवल्लीचे परस्परावलंबन असते. तिच्या शिखरावर सर्वोच्च भक्षक असतो. जंगलाचा सर्वोच्च भक्षक वाघ असतो.नैसर्गिक परिसंस्थेवरील चांगला किंवा वाईट परिणाम सर्वोच्च भक्षकावर होत असतो. 


भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पाणमांजर 'स्मूथ कोटेड ऑटर'ला अनुसूचित वर्ग-दोनमध्ये जागा दिली आहे. तर 'स्मॉल क्लोड ऑटर'ला अनुसूचित वर्ग एक भाग एकमध्ये जागा दिली गेली आहे. अनुसूचित वर्ग एक ते चारमध्ये येणारे सर्व प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहेत. 'स्मॉल क्लोड ऑटर'ला या कायद्यानुसार सर्वोच्च, म्हणजे पट्टेरी वाघाइतके संरक्षण मिळाले आहे.


सुर्या नदी पात्रात आढळलेल्या पाणमांजराच्या संरक्षणासाठी अवैद्य मासेमारी रोखण्याची गरज आहे. दरम्यान सूर्या नदीत आढळून आलेल्या पाणमांजराच्या प्रजातीची माहिती घेऊन त्याचे संरक्षण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. पाणमांजराचा नदीच्या परिसंस्थेला धोका नसून हिताचे असल्याबाबत नदी काठच्या ग्रामस्थांमध्ये जनजागृती मोहीम राबवून पाणमांजराची शिकार रोखण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.