मुंबई : यंदाचं वर्ष अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. काही राजकीय घटनांनी जग, देश आणि राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली होती. तर काही घटनांनी मोठा आश्चर्याचा धक्का बसला. अशाच राज्यातील आणि देशभरातील 2018 मधील महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा.


1. 2018च्या पहिल्याच दिवशी घडलेला कोरेगाव भीमाचा संघर्ष राजकीय, सामाजिक क्षेत्रात पडसाद उमटवणारा ठरला. शहरी नक्षलवादाचा मुद्दा राजकारणात चांगलाच गाजला.


2 .जागतिक राजकारणात 2018मधील सर्वात मोठी घटना घडली ती 12 जून रोजी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांची सिंगापुरात भेट झाली. एकमेकांना अणुहल्ल्याची धमकी देत पृथ्वीला धोक्यात आणणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला आणि तणाव निवळला.


3. देशातील दोन मोठ्या नेत्यांनी 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान, भाजपचे ज्य़ेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन रोजी झाले. त्यांच्या दहा दिवसांआधी तामिळनाडूमधील द्रमुक नेते करुणानिधी यांनी 7 ऑगस्ट 2018 रोजी अखेरचा श्वास घेतला.


4.तुरुंगवासातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची जोमानं राजकारणास सुरुवात झाली. समता परिषदेलाही सक्रीय करुन भुजबळांनी पुन्हा आक्रमकपणे वावरण्यास सुरुवात केली आहे.


5. देशात विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न सुरु असतानाच भाजपाविरोधात काँग्रेसप्रणित आणि तिसरी अशा दोन आघाड्या उभ्या राहू लागल्या. महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना करत एमआयएमशी युतीची घोषणा केली.


6. मराठा समाजाला अखेर आरक्षण मिळालं. 1982 पासून मराठा समाजाने लाऊन धरलेली आरक्षणाची मागणी अखेर यावर्षी मान्य झाली. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आरक्षण 68 टक्क्यांवर पोहचले. मात्र धनगर समाजाची मागणी अद्याप मान्य नाहीच.


7. शिवसेना “आधी मंदिर, मग सरकार” ही घोषणा देत अयोध्येत श्रीराम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक झाली. उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राबाहेर सभा झाली. अयोध्यावारीनंतर शिवसेनेची पंढरपुरातही महासभा झाली. अन्य राज्यात विस्ताराची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.


8. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा विजय झाला, हा भाजपसाठी मोठा धक्का होता. तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीच्या टी. चंद्रशेखर रावांनी सत्ता टिकवली. मिझोराममध्ये मिझो पिपल फ्रंट सत्तेवर, काँग्रेसचा पराभव झाला. कर्नाटकात काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत सत्ता टिकवली. मेघालयात नॅशनल पिपल पार्टीने, त्रिपुरात डाव्यांची सद्दी संपवत भाजपने सत्ता मिळवली. नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत भाजप सत्तेवर आली.


9. महाराष्ट्रात पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने राखला. मात्र त्याचवेळी गोंदिया भंडारा मतदारसंघ मात्र गमावला. नाना पटोले यांनी भाजप सोडतानाच खासदारकीचा राजीनामा दिल्याने तेथे पोटनिवडणूक झाली होती.


10. महाराष्ट्रात भाजपने धुळे, जळगाव, सांगली या महापालिकांमध्ये सत्ता मिळवली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची चमकदार कामगिरी. अहमदनगरमध्ये भाजपने महापौरपदी विजय मिळवला मात्र तो राष्ट्रवादीच्या मदतीनं मिळवल्यानं विजयाला वादाची किनार.