दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1.नाशिक जिल्ह्यातील 10 पेक्षा जास्त बाजार समित्या बंद राहणार, मार्च अखेरीस सलगच्या सुट्ट्या आल्यानं व्यवहार ठप्प राहणार, कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर


2. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आज मैदानात, वाढत्या इंधनदराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन, महाराष्ट्रात काँग्रेसकडून कोणतही नियोजन नाही


Congress Agitation : सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन मुद्द्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेस आजपासून महागाई मुक्त भारत आंदोलन करणार आहे.  31 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान 'महागाई मुक्त भारत' आंदोलन करण्यात येणार आहे.


या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता.  मोदी सरकारनं लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरु केल्याचे सुरजेवाला म्हणाले होते. तर 'राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी' असे म्हणत राहुल गांधींनीही इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून, त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधनाच्या दरात वाढ होत आहे. नोव्हेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच 22 मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्यानं दर वाढत आहेत.


3. उर्जा मंत्री नितीन राऊतांकडून भाजप आमदार बबनराव लोणीकरांविरोधात कारवाईचे आदेश, महावितरणच्या अभियंत्याला आयकरच्या धाडीची धमकी दिल्याचा आरोप


4. हिंदू समाज मुकुटमणी असल्याचं स्वीकारल्यास यूपीएचा जीर्णोधार शक्य, सामनाच्या संपादकीयमधून काँग्रेसला सल्ला, यूपीएचा सातबारा बदलण्याचीही भाषा


एकीकडे राज्यात पारा वाढत असताना, दुसरीकडे राजकीय गरमागरमीही जोरदार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर शिवसेनेनंही यूपीएच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज यावर भाष्य करण्यात आलं आहे. यूपीएचा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर असून त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणं शक्य दिसत नाही, असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे. 


काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात सेक्युलरवादाचं अजीर्ण झाल्यानं भाजपचा विजय झाला असल्याची परखड टीकाही सामनातून करण्यात आली आहे. बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे याचं भान विरोधकांच्या नव्या आघाडीनं ठेवलं तरच यूपीएचा जीर्णोद्धार शक्य आहे, असं सांगत नव्या आघाडीला हिंदूत्वाचा विचार करण्याचा सल्लाही सामनातून शिवसेनेनं दिला आहे.  


5.  महाविकास आघाडीत काँग्रेस आमदार नाराज, 25हून अधिक आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितली, तर नाना पटोलेंकडून मात्र सारवासारव


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 31 मार्च 2022 : गुरूवार



6. राज्यात तूर्त मास्कमुक्ती नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, मोकळा श्वास घेण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांचा हिरमोड


7. दीड वर्षीय 'दत्ता'ला मिळणार 16 कोटींचे इंजेक्शन, लकी ड्रॉ मधून मिळाली मोफत सुविधा, दत्ताला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी नावाचा दुर्मिळ आजार


8.काश्मीर फाईल्सवर टीका करणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या घरावर हल्ला, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचा भाजपचा कट, आपच्या मनिष सिसोदियांचा आरोप


9. राजस्थानातील सारिस्का व्याघ्र प्रकल्पात तीन दिवसांपासून लागलेली आग आटोक्यात, अंजली तेंडुलकरांच्या पाहुणचारात व्यस्त असणाऱ्या बड्या अधिकाऱ्याचं निलंबन, माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्याचा ठपका


10. रशिया-युक्रेन युद्धामुळं राज्यात यलो फिव्हर लशीचा तुटवडा, परदेशी जाणाऱ्यांना दिल्लीत जाऊन लस घेण्याची नामुष्की