Babanrao Lonikar News Updates : शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणं माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना महागात पडणार असल्याची चिन्हं आहेत.  अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणं आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असे ही डॉ. राऊत म्हणाले.


पक्षाच्या संस्काराचाही बुरखा यानिमित्ताने फाटला- राऊत 
मंत्री डॉ. राऊत म्हणाले की, आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणाऱ्या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


लोणीकर यांच्या आरोपांबाबत वस्तुस्थिती 


दोन मीटरचे वर्षभरात 10 लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही.


1. ग्राहक क्रमांक- 490014889105 


श्री. राहुल बबनराव यादव, आलोक नगर, औरंगाबाद 
वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 18 जानेवारी 2021
मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 3 लाख 21 हजार 470


सद्यस्थिती- वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.


2. ग्राहक क्रमांक- 490011009236 


नाव- आय.एस. पाटील, अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद 


वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 27 मार्च 2019 


मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 67 हजार 200 रूपये.


सद्यस्थिती-  वीज बिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे.


लोणीकर हे 10 लाख  वीज  बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास 4 लाख आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 


लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिकाऱ्यांची माफी मागावी
लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिकाऱ्यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इनकम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिकाऱ्यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिकाऱ्यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते,अशी टीका ही डॉ. राऊत यांनी केली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 



संबंधित बातम्या


Jalna News Exclusive : निलंबित करु, आयकर विभागाकरवी धाड टाकू, आ. बबनराव लोणीकरांची महावितरण कर्मचाऱ्याला धमकी


Babanrao Lonikar Explanation on MSEB Officer : महावितरण कर्मचाऱ्यांना धमकी, लोणीकरांचं स्पष्टीकरण